दक्षिण काश्मिरच्या पुलवामामध्ये रात्रभर सुरु असलेल्या चकमकीत लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मिर पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना टिपले. गेल्या महिन्यात पुलवामा इथे पोलिसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यामध्ये ३ पोलिस शहीद झाले होते. तेव्हा मारला गेलेला दहशतवाद्याचा पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात सामामेश होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
“मारले गेलेले तीनही दहशतवादी हे पुलवामातील रहिवासी असून तेलष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. पोलिसांनी यांची ओळख पटवली असून जुनैद शीरगोजरी, फाझिल भट आणि इरफान मलिक अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन एके-४७ रायफल आणि काही गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत” अशी माहिती जम्मू काश्मिरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे.
जुनैद शीरगोजरी हा दहशतवादी १३ मे ला पुलवामा इथे झालेल्या पोलिसांवरील हल्ल्यात सहभागी झाला होता. पुलवामा इथल्या द्राबगम गावात दहशतवादी असल्याची माहिती शनिवारी रत्री मिळाली. त्यानंतर लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मिर पोलिस यांनी संयुक्तपणे संबंधित विभागाची नाकेबंदी केली. मात्र ही सुरक्षा व्यवस्था भेदून जाण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यानी केला. त्यानंतर झालेल्या रात्रभर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले.
आत्तापर्यंत या वर्षात ९९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालकांनी दिली आहे.