एपी, मुलतान (पाकिस्तान)
गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे ख्रिश्चन धर्मीयांची घरे आणि चर्चवर हल्ले करण्यात आले होते. याचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी अशी माहिती दिली की, तीन ख्रिश्चन धर्मीयांनी व्यक्तिगत वादातून अन्य दोघांना ईशिनदा प्रकरणात अडकवण्याचा कट रचला होता. त्यानुसार त्यांनी या दोन व्यक्तींच्या घराबाहेर कुराणाची पाने फेकली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांनी कट रचून राजा आमीर यांच्या घराबाहेर पवित्र कुराणाची पाने फेकल्याचा आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यानंतर आमीर आणि त्याच्या भावाला पवित्र कुराणाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या कटातील मुख्य सूत्रधार परवेझ कोडु याला त्याची पत्नी आणि आमीरचे संबंध असल्याचा संशय होता. ताब्यात घेतलेल्या तीन जणांविरुद्ध हिंसाचार भडकवणे, आमीर आणि त्याच्या भावाला ईशिनदेच्या खोटय़ाप्रकरणी अडकवणे या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात येईल.