काश्मीर खोऱ्यातील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा शांततेत पार पडल्याने संतप्त झालेल्या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी गुरुवारी थेट लष्करालाच लक्ष्य केले. लष्कराने त्यांचा हा डाव हाणून पाडला. दहशतवादी व लष्कर यांच्यात उडालेल्या धुमश्चक्रीत तीन दहशतवादी ठार झाले, तर तीन जवान शहीद झाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक घुसखोरी करू पाहणाऱ्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात सुरक्षा दलांना यश आले.
जम्मू जिल्ह्य़ातील अर्निया येथे लष्कराच्या एका रिकाम्या बंकरमध्ये लपलेल्या चार दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी लष्कराच्या ९२व्या इन्फन्ट्री ब्रिगेडच्या जवानांवरच हल्ला चढवला. लष्कर व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मग एकत्रितरीत्या कोम्बिंग ऑपरेशन करून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना टिपले. मात्र, या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.
दरम्यान, अन्य एका घटनेत सुरक्षा दलांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली. राजौरी जिल्ह्य़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना गुरुवारी सकाळी काही संशयास्पद हालचाली आढळल्या. तातडीने हालचाली करत सुरक्षा दलांनी हा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवादी लपले होते त्या ठिकाणी शोध घेतला असता एका दहशतवाद्याला अटक करण्यात जवानांना यश आले. अब्दुल कय्युमी ऊर्फ पंजाबी असे नाव असलेल्या या दहशतवाद्याकडून सुरक्षा दलाच्या जवानांनी एके-४७ बंदुकीच्या ३० गोळ्या, पाकिस्तानी बनावटीचे एक पिस्तूल व पाकिस्तानी चलनातील आठ हजार रुपये आदी ऐवज जप्त केला.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी उधमपूर जिल्ह्य़ात येत आहेत. दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या अर्निया या ठिकाणापासून मोदींचे प्रचारसभेचे ठिकाण अवघ्या १०० किमी अंतरावर आहे. निवडणूक कार्यक्रम उधळून लावण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असून गुरुवारच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली आहे. पंतप्रधानांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होईल, हल्ल्याच्या घटनांचा त्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे जम्मू भाजपतर्फे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा