काश्मीरच्या मुद्दय़ावरून भारताशी चौथे युद्ध होऊ शकते, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केल्याचे विपर्यस्त वृत्त दिल्याबद्दल पाकव्याप्त काश्मीरमधील तीन शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
शरीफ यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा त्यांच्या कार्यालयाकडून इन्कार करण्यात आला आहे. माहिती विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांवर खराब कामगिरीचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले असल्याचे ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने म्हटले आहे.
पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या सरकारची कोंडी होईल, अशी असंबद्ध माहिती प्रसिद्धीमाध्यमांना पुरविल्याबद्दल वृत्तपत्र माहिती विभागाचे संचालक चौधरी अब्दुर रशीद, माहिती अधिकारी परवेझ अहमद आणि सहसंचालक ख्वाजा इम्रान यांना निलंबित करण्यात आले आहे.
काश्मीर हा चर्चेचा महत्त्वाचा प्रश्न असून त्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चौथे युद्ध होईल, असे शरीफ यांनी म्हटल्याचे विपर्यस्त वृत्त माहिती मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे प्रसृत केले होते.
अशा प्रकारचे वृत्त पसरल्याने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. यापूर्वी झालेल्या युद्धाचे परिणाम काय झाले, त्याचे स्मरण डॉ. सिंग यांनी शरीफ यांना करून दिले.
काश्मीरबाबत शरीफ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करणारे अधिकारी निलंबित
काश्मीरच्या मुद्दय़ावरून भारताशी चौथे युद्ध होऊ शकते, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केल्याचे विपर्यस्त वृत्त
First published on: 08-12-2013 at 03:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three officials suspended in pok for misquoting nawaz sharif on kashmir