Railway Employees Arrested : गुजरातच्या सुरतमध्ये रेल्वे रुळांशी छेडछाड केल्याप्रकरणी रेल्वेच्याच तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तिघांनी केवळ स्वत:चं कौतुक करून घेण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती आहे. सुभाष पोद्दार (३९), मनीष मिस्त्री (२८) आणि शुभम जैस्वाल (२६) अशी या तिघांनी नावे आहेत. हे तिघेही ट्रकमॅन आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या रुळावर सिलिंडरसारख्या वस्तू ठेऊन अपघात घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रुळाबरोबर छेडछाड केल्याने विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
हिंदुस्थान टाईम्सने रेल्वे पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, २१ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. २१ तारखेला तिन्ही आरोपी रात्रपाळीत ड्युटीवर असताना सकाळी ५.३० वाजता रुळ तपासण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका ठिकाणी रुळाचे नट ढिले असून रुळावरची एका बाजुची इलॅस्टिक क्लिप आणि फिशप्लेट दुसऱ्या बाजुला ठेवली असल्याची माहिती त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ज्यावेळी या तिघांनी या घटनेची माहिती दिली. त्याच्या काही मिनिटांपूर्वीच या रुळावरून एक रेल्वेगाडी गेली होती. त्यामुळे गाडी जाण्याच्या आणि अधिकऱ्यांना माहिती देण्याच्या दरम्यान खूप कमी वेळ होता. एवढ्या कमी वेळात इलॅस्टिक क्लिप आणि फिशप्लेट काढून दुसऱ्या बाजुला ठेवणे शक्य नसल्याचे रेल्वे पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी तिन्ही आरोपींची चौकशी केली. तसेच त्यांचे मोबाईल तपासले त्यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये रात्री ३ ते ५ वाजेच्या दरम्यान रेल्वे रुळाशी छेडछेड करतानाचे व्हिडीओ आढळून आले. यासंदर्भात बोलताना, ”आरोपींच्या मोबाईलमधील व्हिडीओवरून त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती देण्याच्या काही तासांपूर्वीच रुळाशी छेडछाड केल्याचं स्पष्ट झाले. याप्रकरणी तिघांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
महत्त्वाचे रेल्वे रुळाशी छेडछाड करण्याचा उद्देशाबाबत विचारला असता, तिघांना अशाप्रकारे वरिष्ठांना माहिती देऊन स्वत:च कौतुक करवून घ्यायचं होतं. मुळात तिघांना रात्रपाळीची ड्यूटी हवी होती, जेणेकडून कुटुंबियांबरोबर वेळ घालवता येईल, त्यामुळे आपण रेल्वेचा अपघात होण्यापूर्वी ट्रकबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली, तर ते आपल्यावर खुश होतील आणि रात्रपाळीची ड्युटी देतील असं त्यांना वाटत होतं. यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं, असं रेल्वे पोलिसांनी सांगितलं.