पीटीआय, श्रीनगर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. हा अपघात बांदीपोरा जिल्ह्याच्या एस के पायन परिसरात घडला. या मार्गावरून जात असताना हे वाहन घसरून दरीत कोसळले. जखमी तीन जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लष्कराच्या चिनार कोअरने ‘एक्स’वर माहिती दिली की, ‘‘बांदीपोरा जिल्ह्यामध्ये कर्तव्यावर असताना वाईट हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे लष्कराचे वाहन दरीत कोसळले. स्थानिक काश्मिरींच्या मदतीने जखमी जवानांची त्वरित सुटका करण्यात आली. मात्र, या दुर्दैवी अपघातात तीन जवान शहीद झाले.’’ स्थानिकांनी तात्काळ केलेल्या मदतीबद्दल लष्कराने त्यांचे आभार मानले. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. जवानांनी बजावलेली सेवा आणि कटिबद्धता यासाठी देश कृतज्ञ आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>Mukesh Chandrakar : पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई, छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पंधरा दिवसांतील तिसरा अपघात

●जम्मू-काश्मीरमधील गेल्या १५ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. पूंछ जिल्ह्यातील मेंढर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ३१ डिसेंबर रोजी सैन्यदलाचे वाहन जवळपास १०० फूट खोल दरीत कोसळले होते.

●या अपघातात पाच जवान शहीद झाले तर पाच जण जखमी झाले होते.

●त्यापूर्वी २४ डिसेंबरला पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये शोधमोहिमेवर असलेले सैन्यदलाचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळून पाच जवान शहीद झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three soldiers killed in bandipora amy