दक्षिण कोरियाचा बीटीएस हा म्युझिक बँड जगभरात चांगलाच लोकप्रिय आहे. विशेषतः तरूणांमध्ये त्याला खूप प्रसिद्धी मिळालेली असून बीटीएसच्या गाण्यांनी तरूण पिढीवर अक्षरशः गारूड घातले आहे. बीटीएसमधील गायकांना भेटण्यासाठी जगभरातील चाहते आतूर असतात. तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील तीन अल्पवयीन मुलीही बीटीएसच्या चाहत्या आहेत. त्यांनी बँडमधली तरुणांना भेटण्यासाठी एक अजब शक्कल लढविली. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला पोहोचण्यासाठी या मुलींनी महिन्याभरापूर्वी नियोजन केले. प्रवासासाठी १४ हजार रुपये गोळा केले आणि मग त्यांनी ठरल्याप्रमाणे प्रवास सुरू केला. मात्र त्याआधीच त्यांचे स्वप्न भंगले आणि पोलिसांनी त्यांची सुटका केली.

हजारो किलोमीटर प्रवासाची अशक्य योजना

तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील या तीनही मुलींचे वय १३ वर्ष असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. आपल्या गावातून चेन्नई आणि मग चेन्नईतून ट्रेनच्या माध्यमातून विशाखापट्टनमला पोहोचायचे. तिथून समुद्रामार्गे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला प्रवास करायचा असा प्लॅन या मुलींनी तयार केला होता. हजारो किलोमीटर दूर असलेल्या संगीत विश्वातील आपल्या प्रेरणास्त्रोत्रांना भेटण्यासाठी या मुलींनी ही असाध्य अशी मोहीम आखली. मात्र या मुलींचे हे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही. चेन्नईला पोहोचल्यानंतर वेल्लोर जिल्ह्यातील काटपाडी रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी त्यांची सुटका केली. यावेळी या मुली घरी परतण्याच्या विचारात होत्या, असे सांगितले जाते. पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या प्रवासाच्या नियोजनाची माहिती घेतली. यावेळी मुलींनी सांगितले की, त्या विशाखापट्टनम येथून बोटीने सेऊलला जाणार होत्या. हा मार्ग त्यांनी इंटरनेटवरून शोधला होता.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हे वाचा >> करोना काळात BTS ने दिला खास संदेश; ‘लाइफ गोज ऑन’गाणं प्रदर्शित

तीनही मुलींची आर्थिक परिस्थिती हलाखीची

या मुलींना सध्या वेल्लोर जिल्ह्यातील सरकारी बालगृहात ठेवले आहे. त्यांचे पालक त्यांना घ्यायला येईपर्यंत पोलिसांकडून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. “या तीनही मुली निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. एका मुलीची आई ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. दुसऱ्या मुलीचे वडील दिव्यांग आहेत, तर तिसऱ्या मुलीचे पालक शेतमजूर असून ते एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. पण या तीनही मुलींकडे स्मार्टफोन आहे. मोबाइलच्या माध्यमातूनच या मुलींना बीटीएस बँडला भेटण्याची आतुरता निर्माण झाली”, अशी माहिती वेल्लोर जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष पी. वेदनारायण यांनी मुलींशी बोलल्यानंतर दिली.

समुपदेशनादरम्यान या मुलींनी सांगितले की, शेजारी राहणाऱ्या मित्रांकडून त्यांना बीटीएस बँड बद्दल कळले. त्यानंतर त्यांचे संगीत मुलींना इतके भावले की, त्यांनी गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने कोरियन गाणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या मुलींना बीटीएसचा नामविस्तारही माहीत होता. वेदनारायण यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, या बँडमधील सातही मुलांचे नाव या मुलींना माहीत होते. एवढेच नाही तर त्यांच्या आवडी-निवडी, आवडते अन्नपदार्थ, आवडते कपडे या सर्वांची माहिती या मुलींना होती.

हे वाचा >> ‘बीटीएस’च्या सैन्यभरतीची एवढी चर्चा का?

चेन्नईला पोहोचेपर्यंत निम्मे पैसे संपले

या मुलींनी ४ जानेवारी रोजी घर सोडले होते. इरोड रेल्वे स्थानकातून चेन्नईसाठी ट्रेन पकडली. चेन्नईत पोहोचल्यानंतर त्यांनी रात्रीचा मुक्काम करायचे ठरविले. यासाठी हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोली शोधली. एका हॉटेलमध्ये १२०० रुपये एका रात्रीचे भाडे देऊन त्यांनी मुक्काम केला, अशीही माहिती वेदनारायण यांनी दिली. दरम्यान इकडे त्यांच्या मुळ गावी, कुटुंबियांच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे हलविली. व्हॉट्सअप ग्रुपमधून मुलींचे फोटो प्रसारित करण्यात आले. तसेच सीसीटीव्ही चित्रणही तपासले.

चेन्नईमध्ये पोहोचलेल्या या मुलींनी दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रेन पकडली. काटपाडी रेल्वे स्थानकात जेवण घेण्यासाठी त्या फलाटावर उतरल्या होत्या. पण जेवण घेत असताना त्यांची ट्रेन सुटली. काटपाडी रेल्वे पोलिसांच्या नजरेस या मुली पडल्या. त्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर करूर जिल्ह्यातील पोलिसांना याची माहिती दिली आणि वेल्लोर जिल्ह्यातील बाल कल्याण समितीकडे तीनही मुलींची रवानगी केली.

वेदनारायण यांनी सांगितले की, या तीनही मुलीनी दक्षिण कोरियाला जाण्यासाठी १४ हजार रुपये गोळा केले होते. दोन दिवसाच्या प्रवासानंतर त्यातील फक्त आठ हजार रुपये त्यांच्याकडे उरले. त्यामुळे एवढ्या पैशात आपण दक्षिण कोरियाला पोहोचणार नाही, याची त्यांना कल्पना आली होती. आपण असे धाडस पुन्हा करणार नाही, अशी कबुली तीनही मुलींनी दिली.