पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी सांगितले, की ठार झालेल्या तीनपैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. नागरिकांच्या हत्यांच्या गंभीर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग होता.
मृत दहशतवाद्यांपैकी एक लतीफ लोन आहे. त्याचा काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट यांच्या हत्येत कथित सहभाग होता, तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव उमर नजीर आहे. तो नेपाळच्या तिलबहादूर थापा यांच्या हत्येत सामील होता. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोपियाँच्या झैनापोरा भागातील मुंझमार्ग येथे शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांशी चकमक उडाली. घटनास्थळावरून एक ‘एके-४७’ रायफल व दोन पिस्तूल जप्त करण्यात आली.