पीटीआय, किश्तवाड
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लष्कराने सुरू केलेल्या मोहिमेत तीन दहशतवादी ठार झाले. एका दहशतवाद्याला शुक्रवारी ठार केल्यानंतर शनिवारी दोघांना ठार करण्यात सैन्यदलाला यश आले. गोळीबारात मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित असून या संघटनेचा प्रमुख दहशतवादी असलेला सैफुल्लाचाही यात समावेश आहे. सैफुल्ला गेल्या वर्षभरापासून चिनाब खोऱ्यात सक्रिय होता.
किश्तवाड परिसरातून दहशतवाद पूर्णपणे उखडून टाकण्याचा निर्धार लष्कराने व्यक्त केला आहे. त्यामुळे या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून लष्कराची कारवाई मोहीम सुरू आहे. किश्तवाडमधील छत्रू परिसरातील डोंगराळ भागांत सुरू असलेल्या कारवाईत खराब आणि प्रतिकूल हवामान असतानाही तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले, तर मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
आसाम रायफल्सचे ५-सेक्टर कमांडर ब्रिगेडियर जे. बी. एस. राठी आणि दोडा-किश्तवाड-रामबन रेंजचे उपमहानिरीक्षक श्रीधर पाटील यांनी सांगितले की, ९ एप्रिलपासून सुरू झालेली ही मोहीम सुरूच आहे. या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्याचे उद्दिष्ट आहे. सैन्याने उत्तम रणनैतिक कौशल्य आणि जलद गती दाखवली. हवामान आणि रात्रीच्या वेळी आव्हाने असूनही सैन्याने चोख कामगिरी करत स्थानिक लोकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले.
जम्मूमध्ये अधिकारी शहीद
जम्मू : जम्मूच्या अखनूर विभागामध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) शहीद झाला. शहीद झालेल्या सैनिकाचे नाव सुभेदार कुलदीप चंद असून ते हिमाचल प्रदेशतील रहिवासी होते. केरी भट्टल भागात ही चकमक झाली. या परिसरात जंगलामध्ये ओढ्याजवळ सशस्त्र दहशवाद्यांचा एक गट सैनिकांना दिसला. त्यांना आव्हान दिल्यानंतर घुसखोरांनी गोळीबार केला. त्यामुळे जोरदार चकमक झाली. भारत आणि पाकिस्तानने २०२१ च्या नियंत्रण रेषेवरील युद्धबंदी कराराला पुन्हा मान्यता दिल्यानंतरही शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले आहे.