Crime News : रेल्वेत गुन्हे घडल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. रेल्वेने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना त्यांचे सामान चोरी होईल अशी भीती वाटत राहते. विशेष म्हणजे बऱ्याचदा रेल्वेतील गुन्हेगार किंवा चोरी झालेलं सामना पोलिसांना सापडत देखील नाही. मात्र उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकावर तीन कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्या पद्धतीने हे गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडले त्याची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. मिळालेल्मया माहितीनुसार, ‘ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी’ मोहिमेअंतर्गत केलेल्या कारवाईत सरकारी रेल्वे पोलिस (GRP) आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांच्या संयुक्त पथकाने या तीन गुन्हेगारांना अटक केली आहे.

नेमकं काय झालं?

रेल्वे स्टेशनवरील कारवाईदरम्यान जीआरपी अधिकार्‍यांना तीन जण एअर वातानुकूलित कोचमधून खाली उतरताना आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर हावडाच्या बाजूने बसलेले दिसले. विशेष बाब म्हणजे, हे तीनही जण घामाने भिजलेले होते. पण ते एसी कोचमधून उतरलेले असताना त्यांना घाम कसा येऊ शकतो? हे पाहून अधिकार्‍यांना संशय आला.

या तिघांची चौकशी केली असता त्यांनी कोचमद्ये खूप गरम होतं होतं असं उत्तर दिलं. मात्र एअर कंडिशनिंगमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळून आला नाही. तसेच पुढील तपासणीत या प्रत्येकाकडे दोन मोबाईल फोन असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले.

अधिक तपासानंतर या तिघांची ओळख रोहतक येथील संजय कुमार, हिसार येथील विनोद कुमार आणि उत्तर प्रदेशच्या बांदा येथील दिलीप साहू अशी झाली. तसेच हे तिघेही पोलिसांना हवे असलेले गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. जीआरपी पोलिसांच्या ते बऱ्याच दिवसांपासून रडारावर होते.

या तिघांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडे चोरी केलेल्या अनेक वस्तू आढळून आल्या ज्यामध्ये सहा मोबाईल फोन, एक सोन्याची अंगठी आणि एक पैंजण यांचा समावेश होता. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत १.५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.