निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात चारही आरोपींची फाशी आत्तापर्यंत तीनवेळा टळली होती. २०१२ मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे सगळा देश हादरला होता. त्यामुळे या प्रकरणातल्या दोषींना फाशीच दिली जावी अशी मागणी होत होती. ज्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २२ जानेवारीचं डेथ वॉरंटही निघालं. मात्र २२ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत निर्भयाच्या दोषींची फाशी तीनवेळा टळली.
डेथ वॉरंट कितीवेळा बदललं?
निर्भया बलात्कार प्रकरणात २२ जानेवारीचं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र पवन कुमार हा अल्पवयीन असल्याची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी बाकी होती. त्यामुळे हे डेथ वॉरंट बदलण्यात आलं.
२२ जानेवारीनंतर डेथ वॉरंट काढण्यात आलं १ फेब्रुवारी २०२० चं. मात्र यावेळीही दया याचिकेवर सुनावणी बाकी आहे असा युक्तीवाद करुन हे डेथ वॉरंट बदलण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे १ फेब्रुवारीलाही दोषींना फाशी होऊ शकली नाही.
त्यानंतर नवं डेथ वॉरंट काढण्यात आलं. तारीख होती ३ मार्च २०२० या दिवशी दोषींना फाशी देण्यात येईल असं कोर्टाने म्हटलं होतं. मात्र ही तारीखही पुढे ढकलली गेली.
त्यानंतर २० मार्च २०२० चं डेथ वॉरंट काढण्यात आलं. या डेथ वॉरंटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
निर्भयाच्या आईचा धीर खचत होता. कारण डेथ वॉरंटसाठीच्या तारखांमध्ये तीनवेळा बदल झाला. अशात आपल्याला न्याय मिळेल की नाही अशी चिंता त्यांना सतावत होती. मात्र सात वर्षांनी का होईना निर्भयाला न्याय मिळाला अशी भावना त्यांच्या मनात आहे.