Tej Pratap Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह धुलिवंदन सण साजरा केला. मात्र त्यांच्या अतिउत्साही वृत्तीवर आता टीका होत आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे कपडे फाडून तेज प्रताप यांनी रंग त्यांच्यावर रंग उधळले. तसेच गाण्याच्या कार्यक्रमात चक्क पोलिसालाच ठुमके (नृत्य) लावण्यास भाग पाडले. पोलिसांच्या गणवेशात असलेल्या जवानाला पाहून तेज प्रताप यादव म्हणाले की, तुला आज ठुमके लावावे लागतील नाहीतर निलंबित व्हावे लागेल. सदर व्हिडीओ आता व्हायरल होत असून बिहारमध्ये यादव यांच्या काळात कशाप्रकारे जंगलराज होते, अशा स्वरुपाची टीका भाजपाकडून केली जात आहे.
होळीनिमित्त आयोजित केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमात बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव म्हणाले, “ये शिपाई, मी आता एक गाणे वाजवणार आहे. त्यावर तुला नाचावे (ठुमके) लागेल. नाही नाचलास तर तुला निलंबित करू” यानंतर तेज प्रताप यादव गाणं गातात आणि पोलीस शिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्यावर नाचतो.
याशिवाय तेज प्रताप यादव यांनी कुर्ता फाड होळी साजरी केली. आपल्या निवासस्थानी आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे कुर्ते फाडून त्यांच्यावर रंग टाकले गेले. होळीच्या कार्यक्रमात तेज प्रताप यादव यांच्या शेजारी बसलेल्या पदाधिकाऱ्याचे शर्ट फाडलेले दिसत आहे.
याशिवाय तेज प्रताप यादव यांच्या निवासस्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांचे कपडे स्वतः तेज प्रताप यादव यांनी फाडले. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका माणसाची बळजबरीने पँट फाडली.
तेज प्रताप यादव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनता दल युनायटेड पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी म्हटले की, अशा कृत्यांना बिहारमध्ये थारा देता कामा नये. बिहारमधील जंगलराज संपुष्टात आलेले आहे. पण लालू यादव यांचे युवराज पोलिसाला नाचण्यासाठी धमकी देत आहेत. तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव किंवा लालू यादव यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असू द्या, त्यांनी आता बिहार बदलला आहे. हे समजून घ्यावे.
भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनीही तेज प्रताप यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, जसा बाप तसा पुत्र. लालू यादव यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या इशाऱ्यावर व्यवस्थेला नाचविले आणि बिहारला जंगलराजमध्ये बदलले. त्याचप्रमाणे आता त्यांचा मुलगा सत्तेच्या बाहेर असतानाही कायद्याच्या रक्षकांना खुलेआम धमकी देत आहे.