मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पाजवळ क्लच-वायरच्या सापळ्यात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. वन अधिकाऱ्याने आज(बुधवारी) ही खळबळजनक माहिती दिली आहे.

वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्लच वायर (वाहनांमध्ये आढळते) सामान्यत: शिकारी प्राण्यांना पकडण्यासाठी वापरतात. अन्य प्राण्याला पकडण्यासाठी हा सापळा लावण्यात आला होता, परंतु त्यामध्ये वाघ अडकला, असण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विक्रमपुर गावाजवळ वाघ फासावर लटकवलेल्या अवस्थेत आढळला. शवविच्छेदनानंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना उत्तर वन मंडळ क्षेत्राच्या पन्ना रेंजच्या लक्ष्मीपुर ते विक्रमपुरच्या जंगलातील आहे. या ठिकाणी अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाला मारून नंतर त्याला फासावर लटकवले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. कदाचित ही पहिली घटना असेल की अशाप्रकारे वाघाला मारलं गेलं.

घटनास्थळी श्वान पथकास करण्यात आले पाचारण –

छतरपुर सीसीएफ संजीव झा यांनी सांगितले की, घटनेचा बारकाईने तपास केला जात आहे. सतना आणि पन्ना येथून श्वान पथकही बोलावण्यात आलं आहे. आम्ही शिकाऱ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत.

“वाघ कसा आणि कोणत्या परिस्थितीत मारला गेला याचा आम्ही तपास करत आहोत. आम्ही नमुने देखील घेतले आहेत आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पशुवैद्यकांनी शवविच्छेदन केले आहे.”, असे रेंजचे वनसंरक्षक संजीव झा यांनी सांगितले आहे.

Story img Loader