प्राणी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. देशातील वाघांची सध्याची संख्या २,२२६ इतकी असून यामध्ये २०१० सालापेक्षा तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१० साली केलेल्या सर्वेक्षणानुसार देशात १,७०६ वाघ होते. यामध्ये गेल्या तीन वर्षात ५२० वाघांची भर पडली आहे.
वाघांच्या मूल्यांकनाचा २०१४ सालचा अहवाल सादर करताना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, “जगामध्ये दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होत असताना भारतात मात्र वाघांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत वाढ झाली आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे.”  तसेच जगातील सर्वोत्तम व्यवस्थापित व्याघ्रप्रकल्प भारतात असल्याचीबाब अभिमानास्पद असल्याचेही जावडेकर म्हणाले. वाघांची संख्या मोजताना देशात वाघांचे अस्तित्व असणाऱया १८  राज्यांमध्ये तब्बल ३,७८,११८ किलोमीटर जंगल भूभागाचे सर्वेक्षण केले गेले. कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये वाघांच्या संख्येचे प्रमाण वाढले असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. प्राणी आणि मानवाचा संघर्षाची प्रकरणे उद्भवणार नाहीत यासाठी काळजी घेण्याची गरज देखील जावडेकर यांनी यावेळी बोलून दाखवली. जंगलात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा आणि गवताळ प्रदेश उपलब्ध करून देण्याचा आम्ही निर्धार केला आहे की जेणेकरून प्राण्यांना सुस्थितीत जगता येईल, असेही ते पुढे म्हणाले.
javedkar-tigers

Story img Loader