आम आदमी पक्षाचे (आप) नेते व मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार कारागृहात मालीश दिली जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्येंद्र जैन जेलमध्ये पलंगावर झोपलेले असताना एक व्यक्ती त्यांना मालीश देत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान ही मालीश नसून फिजिओथेरपी असल्याचा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. यादरम्यान तिहार जेलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर खळबळ उडाली आहे. सत्येंद्र जैन यांना मालीश देणारी व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून, बलात्काराचा आरोपी असल्याची माहिती मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिहार जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “सत्येंद्र जैन यांना मालीश देणाऱ्याचं नाव रिंकू ताराचंद असं आहे. तो बलात्कार प्रकरणाचा आरोपा असून त्याच्या पॉक्सो आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे”. रिंकू फिजिओथेरपिस्ट नसल्याची सूत्रांची माहिती आहे. जे पी कलन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

‘आप’ नेत्याच्या तुरुंगातील ‘मालीश उपचारां’वर भाजपचा आक्षेप

आम आदमी पक्षाचे नेते आणि मंत्री गोपाल राय यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. “अमित शाह कारागृहात गेले होते तेव्हा त्यांच्यासाठी विशेष कारागृह तयार करण्यात आलं होतं. सीबीआयच्या रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. जगातील कोणत्याही नेत्याला कारागृहात इतकी विशेष सेवा देण्यात आली नसेल, पण त्यांना मिळाली. मुद्दा सत्येंद्र जैन यांना मिळणाऱ्या वागणुकीचा नाही. दिल्लीतील जनतेने पालिका निवडणुकीत आपला विजयी करण्याचं ठरवलं आहे आणि ४ डिसेंबरला भाजपाचा पराभव होणार हाच मुद्दा आहे. यामुळेच हे सर्व काही होत आहे”

नेमकं काय झालं होतं?

५८ वर्षीय जैन हे सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत आहेत. व्हायरल व्हिडीओत जैन काही कागदपत्रे वाचताना दिसत आहेत. यावेळी एक पांढरा टी शर्ट घातलेली व्यक्ती त्यांची मालीश करताना दिसत आहे. यावर खुलासा करताना ‘आप’चे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं होतं की, जैन यांना पाठीच्या दुखापतीमुळे ‘फिजिओथेरपी’चा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र भाजप त्यांच्या आजाराची खिल्ली उडवत आहे.

दिल्ली कारागृह विभाग आपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतो. या आठवडय़ाच्या सुरुवातीला, तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांना कारागृहात जैन यांना विशेष वागणूक दिल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले होते. जैन यांना तिहार कारागृहात विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) येथील न्यायालयात केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tihar jail sources reveals a man giving massage to satyendar jain is a prisoner in rape case sgy