तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपुत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून देशात गोंधळ सुरू आहे. यावरून उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीला लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अप्रत्यपक्षणे उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे.
स्मृती इराणी यांनी दिल्लीतील द्वारका येथे श्री कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमास हजेरी लावली. तेव्हा कोणीही आमच्या धर्म आणि श्रद्धेला आव्हान देऊ शकत नाही, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या, “ज्यांनी सनातन धर्माला आव्हान दिलं आहे. त्यांच्या कानापर्यंत आपला आवाज पोहाचला पाहिजे. जोपर्यंत भक्त जिवंत आहेत, तोपर्यंत कोणीही आमच्या धर्म आणि श्रद्धेला आव्हान देऊ शकत नाही.”
यानंतर जोरात ‘कृष्ण कन्हैया लाल की जय…’ असं म्हणण्याचं आवाहन स्मृती इराणींनी उपस्थित भक्तांना केलं.
दरम्यान, याप्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केलं आहे. “सनातन धर्मावरून तीव्र झालेल्या वादावर, योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज आहे,” असे मत पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत मांडले.
हेही वाचा : सनातन धर्माबद्दल उदयनिधी स्टॅलिन यांचं वादग्रस्त विधान; काँग्रेस नेते आचार्य प्रमोद फटकारत म्हणाले…
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?
“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं.