TIME 100 Most Influential People of 2025 : टाइम मासिकाची जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी समोर आली आहे. जगभरातील लोकांना या यादीची प्रतीक्षा असते. टाइमने २०२२५ मधील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत जगासमोर व्यापार युद्धाचा पेच निर्माण करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते तसत भारताविरोधात गरळ ओकणारे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यापर्यंत अनेकांची नावे आहेत. मात्र, या यादीत एकाही भारतीयाचं नाव नसल्याचं पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

टाइम मासिकाच्या याआधीच्या वर्षांमधील प्रभावशाली व्यक्तींच्या याद्या पाहिल्या तर भारतीयांना आश्चर्य वाटेल. कारण याआधीच्या याद्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भारतीयांचा समावेश केला जात होता. मात्र, यंदा टाइमने एकाही भारतीयाची दखल घेतलेली दिसत नाही. यंदाच्या यादीत ट्रम्प यांच्यासह टेस्ला, स्पेसएक्स व एक्सचे मालक तथा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क देखील आहेत.

यादीचं तीन श्रेणींमध्ये विभाजन

२०२५ ची टाइमची १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहे. त्यांना लीडर्स, टायटन्स, आयकॉन्स अशी नावे देण्यात आली आहेत. या यादीतील ‘लीडर्स’ श्रेणीत ब्रिटनचे पंतप्रधान कीर सार्मर, शांततेचं नोबल मिळालेले मोहम्मद युनूस, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचा समावेश आहे. ही यादी यंदा तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या यादीत आलिया भट्ट व साक्षी मलिकचा समावेश होता

टाइमच्या २०२४ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट व ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकचं नाव होतं. मात्र, या वर्षी या यादीत एकही भारतीय नाही. तंत्रज्ञान, कला व क्रीडा क्षेत्रात भारत उत्कृष्ट कामगिरी करत असताना टाइमच्या यादीत एकाही भारतीयाचं नाव नसल्याचं पाहून समाजमाध्यमांवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केली आहे.

टाइमकडून एका भारतीय वंशाच्या महिलेची दखल

टाइम मासिकाच्या यंदाच्या यादीत एकही भारतीय व्यक्ती नसली तरी एका भारतीय वंशाच्या महिलेची टाइमने दखल घेतली आहे. रेश्मा केवलरमानी असं या महिलेचं नाव आहे. त्या वर्टेक्स फार्मास्युटिकल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रेश्मा या ११ वर्षांच्या असताना अमेरिकेला गेल्या होत्या आणि आता त्या तिथेच स्थायिक झाल्या आहेत. रेश्मा या अमेरिकेतील मोठ्या पब्लिक बायोटेक्नोलॉजी कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ आहेत.