पुणे : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच होते, अशा प्रतिक्रिया निवृत्त अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला झाला, या वेळेचाही उल्लेख तज्ज्ञांनी केला.ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि.) म्हणाले, ‘पाकिस्तानने हा हल्ला आम्ही केला नाही, असे म्हटले आहे. असे म्हणणे हास्यास्पद आहे. भारताकडून प्रत्युत्तराच्या भीतीमुळे त्यांच्याकडून अशी विधाने येत आहेत. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अनेक उपाय आहेत. लष्करी पातळीवर विचार केला, तर उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ल्यानंतरचा हवाई हल्ला असे काही तरी होऊ शकते. क्षेपणास्त्रे, तोफखान्याचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचे नुकसान करू शकतो. पद्धती अनेक आहेत. विश्लेषण करून त्यातील एक पद्धत वापरली जाईल.’
मेजर जनरल (नि.) नितिन गडकरी म्हणाले, ‘या हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानला बसत असलेला धक्क्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळावे, यासाठी चाललेला हा प्रयत्न असू शकतो. तसेच, पाकिस्तानमध्ये लष्कराची पत पुन्हा प्रस्थापित होण्यासाठीचाही हा प्रयत्न असू शकतो. पाकच्या लष्करप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी जे भाषण केले आणि त्यात ते जे म्हणाले, तसे आता कुणी बोलत नाही.’
जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तुषार रायसिंग यांनी सांगितले, की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांनी ‘ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेंशन’मध्ये केलेल्या भाषणाचीही पार्श्वभूमी आहे. काश्मीर ही पाकिस्तानची जीवनवाहिनी (जुग्युलर व्हेन) असल्याचे त्यात मुनिर यांनी म्हटले आहे. द्विराष्ट्र सिद्धांताची त्यांनी पुन्हा नव्याने मांडणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
लष्करात मनुष्यबळाची गरज
एका वृत्तवाहिनीशी बोलताना निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी करोना काळात लष्करभरती झाली नसल्याची खंत व्यक्त केली. या काळात १ लाख ८० हजार जवानांनी लष्कराची ताकद कमी झाल्याचे वास्तव त्यांनी मांडले. जंगल, पर्वतात लढण्यासाठी, चीन-पाकिस्तान आणि आता बांगलादेशचे आव्हान पाहता लष्करात मनुष्यबळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.