यंदाच्या वर्षीचे सर्वोत्तम संशोधन म्हणून ‘टाइम’ नियतकालिकाने मंगळयानावर गौरवमुद्रा उमटवली आहे! मंगळयान मोहिमेच्या माध्यमातून आंतरतारकीय जगात भारताने आपले बाहू पसरले आहेत अशा शब्दांत ‘टाइम’ने या संशोधनाचा गौरव केला. प्रा. नलिनी नाडकर्णी यांनी कैद्यांसाठी बनवलेली ब्लू रूम संकल्पना आणि गुगलचे माजी अभियंते प्रमोद शर्मा यांनी मुलांसाठी बनवलेला ऑस्मो टॅबलेट या अनिवासी भारतीयांच्या संशोधनांचाही ‘टाइम’ने गौरव केला.
टाइमने पुढे म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, युरोपीय देश यांच्यासह कुणालाही पहिल्याच प्रयत्नात मंगळाचा लक्ष्यभेद करता आला नव्हता. भारताला मात्र पहिल्याच प्रयत्नात २४ सप्टेंबर रोजी मंगळ गवसला. मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत गेले तेव्हा त्या यानाबरोबरच भारतानेही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातला मोठा टप्पा गाठला. मंगळयान हे सुपरस्मार्ट स्पेसक्राफ्ट आहे, असे वर्णन टाइमने केले आहे. टाइमने वर्षांतील २५ उत्कृष्ट संशोधनांची जी यादी जाहीर केली आहे त्यात जग सुंदर करणाऱ्या तर काही गमतीशीर संशोधनांचा विचार करण्यात आला आहे. मंगळयान भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ७४ दशलक्ष डॉलरमध्ये तयार केले. त्यापेक्षा ऑस्कर मिळालेल्या ‘ग्रॅव्हिटी’ या चित्रपटालाही जास्त खर्च आला होता. टाइमने म्हटले आहे की, एकतर कमी किमतीत मंगळयान तयार केले होते, शिवाय मंगळावरील मिथेन व तेथील मातीची रचना तपासण्यासाठी त्यावर पाच उपकरणे ठेवण्यात आली होती.
लॉकहीड मार्टिन कंपनीने तयार केलेली अणुसंमीलन भट्टी, अॅपलचे स्मार्ट वॉच यांचाही टाइमच्या यादीत समावेश आहे. अॅपलचे घडय़ाळ केवळ वेळच सांगत नाही तर फिटनेस, दिशा संदेश पाठवणे, वायरलेस पेमेंट ही कामे करते. मायक्रोसॉफ्टच्या सरफेस प्रो ३ या हायब्रीड बँडल्स लॅपटॉपचे यात १२ इंची टॅबलेटमध्ये रूपांतर केले आहे, डेस्क टॉप अॅप्सवर तो चालतो.
प्रा. नाडकर्णीची ब्लू रूम
‘स्नेक रिव्हर करेक्शनल इन्स्टिटय़ूशन’च्या मदतीने वन परिसंस्थातज्ज्ञ नलिनी नाडकर्णी यांनी ओरेगॉन येथे कैद्यांसाठी ब्लू रूम तयार केली आहे. एकांतवासातील कैद्यांना फार लहान कोठडीत ठेवतात, त्यामुळे त्यांना मानसिक आजार जडतात. ब्लू रूममध्ये प्रोजेक्टरच्या मदतीने वाळवंट, धबधबे व बाहेरचे निसर्गदृश्य यांचा आभास केला जातो. यामुळे कैद्यांना निसर्गाच्या सान्निध्यात असल्यासारखे वाटून त्यांचे मन प्रसन्न होते.
शर्माचे ऑस्मो टॅब
आपली मुलगी दिवसरात्र टॅबलेटमय झाल्याचे पाहून गुगलचे माजी अभियंता प्रमोद शर्मा यांनी ऑस्मो हे टॅबलेट खेळणे तयार केले. तंत्रकैदी होऊन मुले जगापासून दुरावू नयेत आणि त्यांच्यातील प्रतिभा व बौद्धिक क्षमता विकसित व्हावी, या दृष्टीने शर्मा यांनी ऑक्टोबरमध्ये ऑस्मो टॅबलेट टॉय तयार केले. त्याला आज जगभर मागणी आहे.
भारताच्या मंगळ मोहिमेवर ‘टाइम’ची गौरवमुद्रा!
यंदाच्या वर्षीचे सर्वोत्तम संशोधन म्हणून ‘टाइम’ नियतकालिकाने मंगळयानावर गौरवमुद्रा उमटवली आहे! मंगळयान मोहिमेच्या माध्यमातून आंतरतारकीय जगात भारताने आपले बाहू पसरले आहेत अशा शब्दांत ‘टाइम’ने या संशोधनाचा गौरव केला.
First published on: 22-11-2014 at 05:18 IST
TOPICSमंगळयान
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time magazine picks mangalyaan for best inventions of