संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सुटीवर गेल्याने निर्माण झालेल्या वादावर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राहुल गांधी यांना सुटीसाठी योग्य वेळ निवडता आली असती, असे सूचक विधान करून दिग्विजय यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ऐन अर्थसंकपल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राहुल गांधी यांनी दोन आठवड्यांची सुटी घेतल्याने पक्षात नाराजीचे वातावरण आहे. पक्षाच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी राहुल गांधी सुटीवर जाणार असतील तर यात काहीच गैर नाही. फक्त या सुटीसाठी योग्य वेळ निवडण्याची गरज होती, असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.
लोकसभेपाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणुकीत पालापाचोळ्यासारखे उडून गेलेल्या काँग्रेसची स्थिती बिकट असताना ऐन अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या अधिवेशन काळात पक्षाच्या उपाध्यक्षानेच सुटी घेतल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात २५ फेब्रुवारीला आंदोलन करण्याची रणनीती आखणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सुटीमुळे तोंडघशी पडले आहेत. तर एप्रिलमध्ये होणाऱया काँग्रेस अधिवेशनात राहुल यांना पक्षाध्यक्ष करण्यात येणार असल्याने रणनीती ठरवण्यासाठी त्यांनी सुटी घेतल्याची सारवासारव काही नेते करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा