Tirupati Prasad ladu : जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना तिरुमला तिरुपती प्रसाद लाडूमध्ये भेसळ करुन प्राण्यांची चरबी वापरण्यात आली. असा खळबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. त्यानंतर हा वाद पेटला आहे. तसंच त्या वेळच्या लाडूचे नमुने हे जेव्हा प्रयोगशाळेत धाडण्यात आले तेव्हा त्यात चरबी असल्याची बाबही समोर आली. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर तिरुमला मंदिराच्या शुद्धीसाठी शांती होम सुरु करण्यात आला आहे. पंचगव्य प्रोक्षण होम करुन मंदिराची शुद्धी सुरु करण्यात आली आहे. तसंच हे प्रकरण SIT म्हणजेच विशेष तपास समितीकडे सोपवण्यात आलं आहे.

लाडू भेसळ चौकशीसाठी विशेष तपास समिती

प्रसाद लाडू भेसळ प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास समिती स्थापण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेत ही समिती काम करणार आहे. एसआयटीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे यामध्ये सत्तेचा दुरुपयोग कुणी केला? हे देखील तपासलं जाणार आहे. या समितीचा अहवाल सरकारला सोपवला जाईल. हा अहवाल आल्यानंतर आम्ही कठोर पावलं उचलू असं चंद्रबाबू यांनी म्हटलं आहे. तिरुमला तिरुपती हे पवित्र देवस्थान आहे. या देवाच्या प्रसाद लाडूत पुन्हा भेसळ करण्याची हिंमत कुणी दाखवता कामा नये अशा प्रकारे आम्ही शासन करु असंही नायडू यांनी म्हटलं आहे. सध्या मंदिराच्या शुद्धीसाठी बंगारु बावी (सुवर्ण विहीर) आणि यज्ञशाळेत शांती होम केला जातो आहे.

चंद्राबाबू नायडूंचा आरोप काय?

तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून मिळणारे लाडू (Tirupati Balaji Prasad Ladoo) सध्या चर्चेत आहेत. याचं कारण आहे चंद्राबाबू नायडूंनी वाय एस आर जगन रेड्डींवर केलेला आरोप. माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या कार्यकाळात या लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरली गेली आणि लाडूंचं पावित्र्य भंग करण्यात आलं असा आरोप चंद्राबाबू नायडूंनी केला आहे. तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये ( Tirupati Balaji Prasad Ladoo ) प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलचे अंश आढळून आल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती लॅबच्या तपासणी रिपोर्टमधून समोर आली आहे.

तिरुपती बालाजी मंदिरात लाडूंची परंपरा ३०० वर्षांपासून

तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून तयार केल्या जाणाऱ्या लाडूची ( Tirupati Balaji Prasad Ladoo ) परंपरा ३०० वर्षांपासून आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार १७१५ या वर्षापासून तिरुपती मंदिरात लाडूचा प्रसाद तयार करण्यात येतो. या लाडूची खासियत आहे की हे लाडू बरेच दिवस खराब होत नाहीत. तसंच या लाडवांची किंमत १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत अशी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक लाडूचा प्रसाद घेऊन जातोच जातो. आता या लाडूंमध्ये भेसळ झाल्याची बाब समोर आल्याने या मंदिरात शांतीहोम केला जातो आहे.