Tirupati Laddu Row Devotee claims Tobacco in Balaji Prasadam : आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये जनावरांच्या चरबीचा आणि निकृष्ट दर्जाच्या तूपाचा वापर केला जात होता, असं म्हणत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली. पाठोपाठ लाडवांच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) शुक्रवारी सांगितले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirupati Balaji) हे जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. अशातच आता, या लाडवांमध्ये तंबाखू आढळल्याचा दावा एका भाविकाने केला आहे.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार. तेलंगणामधील खम्माम जिल्ह्यातील रहिवासी दोंतू पद्मावती यांनी दावा केला आहे की त्यांना तिरुपती मंदिरातून प्रसाद म्हणून मिळालेल्या लाडवांमध्ये तंबाखूची पुडी आढळली आहे. महिलेने म्हटलं आहे की तिने प्रसादात मिळालेले लाडू घरी नेले होते. मात्र, त्या लाडवांमध्ये तंबाखूची कागदाची पुडी आढळली आहे. याचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (आम्ही या व्हिडीओची पुष्टी केलेली नाही.)
काय म्हणाल्या पद्मावती?
खम्माम जिल्ह्यातील कार्तिकेय परिसरात राहणाऱ्या दोंतू पद्मावती या १९ सप्टेंबर रोजी तिरुमाला मंदिरात गेल्या होत्या. तिथे जाणाऱ्या प्रत्येक भक्ताप्रमाणे पद्मावती यांना देखील तिथे प्रसाद मिळाला. त्यांनी तो प्रसाद घरी नेला आणि कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक व शेजाऱ्यांना वाटला. पद्मावती म्हणाल्या, “आम्ही लाडूचं पाकीट उघडलं, लोकांमध्ये वाटण्यासाठी लाडूचे तुकडे केले. त्यावेळी आम्हाला त्यामध्ये कागदाच्या पुडीत बांधलेली तंबाखू आढळली. लाडवात तंबाखू असल्याचं पाहून आम्हा सर्वांना धक्का बसला. आम्हाला वाटलेलं की हा प्रसाद पवित्र असेल, मात्र प्रसादात तंबाखू असल्याचं पाहून आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटलं”. दरम्यान पद्मावती यांनी केलेल्या या दाव्याने अनेकांना धक्का बसला आहे.
चंद्राबाबू नायडूंचा नेमका आरोप काय?
चंद्राबाबू नायडू म्हणाले, मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं (Tirupati Balaji) पावित्र्य घालवलं. ‘अन्नदानम’ अर्थात मंदिरातर्फे जे अन्नदान केलं जातं त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसंच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे.