Tirupati Laddoo Row : तिरुमला तिरुपती देवस्थान येथे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरली गेल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आंध्रप्रदेशातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. मात्र, या वादाचा लाडूच्या विक्रीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पुढे आलं आहे.

एनडीटीव्हीने मंदिर प्रशासनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या चार दिवसांत तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिरातून १४ लाखांपेक्षा जास्त लाडूंची विक्री झाली आहे. १९ सप्टेंबर रोजी एकूण ३.५९ लाख, २० सप्टेंबर रोजी ३.१७ लाख, २१ सप्टेंबर रोजी ३.६७ लाख, तर २२ सप्टेंबर रोजी ३.६० लाख लाडूंची विक्री झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा वाद निर्माण होण्यापूर्वी दिवसाला सरासरी ३.५० लाख लाडूंची विक्री होत होती. तीच आता कायम आहे, असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – Prakash Raj: ‘तुझ्या दिल्लीतील मित्रांमुळे धार्मिक तणाव’, तिरुपती प्रसाद वादावर अभिनेते प्रकाश राज यांची पवन कल्याण यांच्यावर टीका

भाविकांचे म्हणणं काय?

यासंदर्भात भाविकांना विचारलं असता, आमची तिरुपती बालाजीवर अपार श्रद्धा आहे. अशा गोष्टींमुळे आमचा विश्वास डळमळीत होणार नाही. हा वाद आता जुना झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लाडूपासून मंदिर प्रशासनाला किती महसूल मिळतो?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानकडून दररोज तीन लाख लाडू बनविले जातात. या लाडूच्या विक्रीमधून देवस्थानाला वर्षाकाठी ५०० कोटींचा महसूल मिळतो. देवस्थानात दर्शन घेतल्यावर आणि मंदिराच्या बाहेर अनेक स्टॉल्सवर हे लाडू उपलब्ध असतात. जर व्यवस्थित पॅकिंग केल्यास हे प्रसादाचे लाडू १५ दिवस टिकतात.

हेही वाचा – Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती

तिरुपती बालाजी ट्रॅव्हल्सने दिलेल्या माहितीनुसार, तीन आकारमानाच्या प्रकारात लाडू उपलब्ध होतात. लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे लाडू मिळतात. त्याचा आकार अनुक्रमे ४० ग्रॅम, १७५ ग्रॅम आणि ७५० ग्रॅम इतका असतो. श्री वेंकटेश्वर मंदिराच्या आतमध्ये छोट्या आकाराचे लाडू भाविकांना प्रसाद म्हणून मोफत वाटले जातात. तर मध्यम आकाराचे लाडू प्रति नग ५० रुपये आणि मोठ्या आकाराचा लाडू प्रति नग २०० रुपयांना विकला जातो.