टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली टायटन ही पाणबुडी चार दिवसांपासून बेपत्ता होती. ९६ तास पुरेल इतका प्राणवायूचा साठा घेऊन ही पाणबुडी रविवारी (१८ जून रोजी) समुद्राच्या तळाशी झेपावली होती. काहीच तासांनी या पाणबुडीचा संपर्क तुटला आणि ती बेपत्ता झाली. त्यानंतर अमेरिकेसह कॅनडाच्या नौदलाने तसेच पाणबुडी ऑपरेट करणाऱ्या कंपनीने ही पाणबुडी शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू केली होती. अखेर चार दिवसांनी या पाणबुडीमधील पाचही अभ्यासकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पाणबुडी ऑपरेट करणारी कंपनी ओशिएनगेटने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पाणबुडीमध्ये ब्रिटीश उद्योगपती हमिश हार्डिंग, पाकिस्तानी गुंतवणूकदार शाहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान, फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट आणि ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश यांचा समावेश होता. या पाचही जणांबद्दल जाणून घेऊयात.

हमिश हार्डिंग

हार्डिंग हे अॅक्शन एव्हिएशन या विमान विक्री आणि कन्सल्टिंग कंपनीचे अध्यक्ष होते. नासाचे निवृत्त अंतराळवीर टेरी व्हर्ट्स यांनी त्यांचे मित्र हार्डिंग यांच्याबद्दल माहिती दिली. हार्डिंग यांनी २०१९ मध्ये पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांभोवती सर्वात वेगवान उड्डाण करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. ज्यामध्ये टेरी व्हर्ट्स क्रू मेंबर म्हणून त्यांच्यासोबत होते. हार्डिंग यांनी महासागराच्या खोल प्रदेशात क्रूड जहाजाद्वारे सर्वात जास्त कालावधीसाठी आणि सर्वात लांब अंतर प्रवास करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील मोडलेला आहे.

टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या अब्जाधीशांचा दुर्दैवी मृत्यू, जहाजाजवळ सापडले पाणबुडीचे तुकडे

स्टॉकन रश

ब्रिटीश व्यावसायिक असलेल्या स्टॉकन रश यांनी २००९ मध्ये ओशन गेट नावाच्या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी महासागराच्या पृष्ठभागाखाली २० हजार फुटांपर्यंत प्रवास करू शकणार्‍या पाणबुडीची निर्मिती करते. १९८१ मध्ये, वयाच्या १९ व्या वर्षी रश हे जगातील सर्वात तरुण जेट ट्रान्सपोर्ट-रेट केलेले पायलट बनले होते. त्यांनी कैरो, मुंबई आणि झुरिच सारख्या ठिकाणांवर उड्डाण केलं होतं. त्यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतून एरोस्पेस इंजिनीअरिंगची डिग्री आणि यूसी बर्कले येथून बिझनेस मास्टर्स डिग्री घेतली होती. १९८९ मध्ये त्यांनी स्वतःचं प्रायोगिक विमान तयार केलं. सोनार सिस्टीम, सॉफ्टवेअर आणि रिमोट कंट्रोल्स बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच सिएटलमधील ‘द म्युझियम ऑफ फ्लाइट’मध्ये त्यांनी बोर्ड आणि डेव्हलपमेंट टीम्समध्ये देखील काम केलं होतं, अशी माहिती त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे.

पॉल-हेन्री नार्गोलेट

पॉल-हेन्री नार्गोलेट यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला, पण ते कुटुंबासह १३ वर्षे आफ्रिकेत राहिले आणि नंतर पुन्हा फ्रान्सला गेले होते. जहाजांबद्दल असलेलं ज्ञान आणि कौशल्यामुळे पॉल-हेन्री नार्गोलेट ‘मिस्टर टायटॅनिक’ म्हणून ओळखले जायचे. फ्रेंच नौदलात २२ वर्षे सेवा करणाऱ्या नार्गोलेट यांना कमांडरपद मिळालं होतं. १९८६ मध्ये नौदलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी ‘फ्रेंच इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड एक्स्प्लॉयटेशन ऑफ द सी’ इथे दोन डीप-सी सबमर्सिबलची देखरेख केली. तिथे असतानाच त्यांनी टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत फर्स्ट रिकव्हरी डाईव्ह केली होती.

टायटॅनिकचा इतिहास जतन करण्यासाठी पाण्याखाली संशोधन करणारी कंपनी ‘RMS Titanic Inc.’ आणि इतर मनोरंजन साहित्य पुरवणारी कंपनी ‘E/M Group’ या कंपन्यांचे ते संचालक होते. नार्गोलेट आपल्या कारकिर्दीत तब्बल ३७ वेळा टायटॅनिक जहाजापर्यंत जाऊन आले होते.

शहजादा दाऊद

शहजादा दाऊद हे पाकिस्तानी ऊर्जा गुंतवणूक कंपनी एनग्रो तसेच दाऊद हर्क्युलस कॉर्प या दोन कंपन्याचे उपाध्यक्ष होते. त्यांनी SETI इन्स्टिट्युट, नानफा संस्था, प्रिन्स चार्ल्सची धर्मादाय संस्था, प्रिन्स ट्रस्ट इंटरनॅशनल अशा विविध कंपन्या आणि संस्थाच्या बोर्डमध्ये काम केलं होतं. त्यांनी यूकेमधील बकिंगहॅम युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी आणि फिलाडेल्फिया विद्यापीठातून ग्लोबल टेक्सस्टाईल मार्केटिंग विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं होतं. टायटॅनिकचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सुलेमानही गेला होता. त्याचाही मृत्यू झाला आहे.

सुलेमान दाऊद

शहजादा दाऊद यांचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. त्याने स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मेजरचं पहिलं वर्ष पूर्ण केलं होतं. तोही वडिलांबरोबर टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेला होता. वडिलांबरोबर सुलेमानचाही या मोहिमेत मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Titan submarine accident who is stockton rush hamish harding shahzada dawood and his son suleman paul henri nargeolet found dead hrc
Show comments