महाकाय टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेला १०० वर्ष उलटून गेली आहेत. पण आजही या जहाजाबद्दलचे कुतूहल अजिबात कमी झालेले नाही. टायटॅनिक जहाजाबद्दलच्या कथा, माहिती आवर्जून वाचली जाते. १९९७ साली प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी या दुर्घटनेवर बनवलेला टायटॅनिक सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. जगभरात या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुन या विषयाबद्दल सर्वसामान्यांना असणारे आकर्षण लक्षात येते.

हीच बाब ध्यानात घेऊन ऑस्ट्रेलियातील खाण सम्राट क्लाईव्ह पालमेर टायटॅनिक २ ची निर्मिती करत आहेत. टायटॅनिक २ मूळच्या आरएमएस टायटॅनिक जहाजाची हुबेहूब प्रतिकृती असणार आहे. १९१२ साली टायटॅनिक जहाज जेव्हा आपल्या पहिल्या प्रवासाला निघाले तेव्हा हे जहाज कधीच बुडणार नाही अशी जाहीरात करण्यात आली होती. त्या काळातील ते सर्वात अत्याधुनिक, आलिशान जहाज होते. सर्व पर्यायी व्यवस्था त्या जहाजामध्ये होती. पण नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही.

आपल्या पहिल्याच प्रवासात टायटॅनिकला जलसमाधी मिळाली. त्यावेळी संपूर्ण जगासाठी हा एक धक्का होता. असं कसं घडलं ? हाच प्रश्न अनेकांना पडला होता. पण टायटॅनिक अपघाताचे सत्य स्वीकारावे लागले. आता क्लाईव्ह पालमेर ‘टायटॅनिक २’ अनकिलेबल म्हणजे अजरामर या धर्तीवर बनवत आहेत. टायटॅनिक २ चे २०२२ साली जलावतरण होणार आहे. मूळ आरएमएस टायटॅनिक ज्या मार्गावरुन गेली होती, त्याच मार्गावरुन टायटॅनिक २ प्रवास करणार आहे.

ऑटीस्टीक बॉय कंपनी टायटॅनिक २ ची बांधणी करणार आहे. टायटॅनिक २ मुळे नागरिकांना पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक आठवणी जागवण्याची संधी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी पालमेर यांनी ब्ल्यू स्टार लाईन कंपनी स्थापन केली. २०१२ साली त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. ३८५ मिलियन युरोचा हा प्रकल्प २०१६ साली पूर्ण होणे अपेक्षित होते. आर्थिक वादामुळे २०१५ साली या जहाजाचे बांधकाम थांबवण्यात आले. मूळ टायटॅनिकच्या ११० व्या स्मृतीदिनी टायटॅनिक २ बांधून पूर्ण होईल अशी माहिती आहे. टायटॅनिक २ वर ९०० क्रू सदस्यांसह २४०० जणांच्या आसनाची व्यवस्था असेल.

साऊथमटॉन ते न्यूयॉर्क या मूळ टायटॅनिकच्या मार्गावरुन टायटॅनिक २ प्रवास करेल. नव्या टायटॅनिकमध्ये सुरक्षेच्या जास्त उपायोजना असतील. जास्तीत जास्त लाईफ बोटींसह आधुनिक दिशादर्शक यंत्रणा असेल. कोळशाऐवजी हे जहाज डिझेलवर चालेल. या जहाजावर फर्स्ट,सेकंड आणि थर्ड क्लास तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध असतील.