मार्क्‍सवादी नेते अब्दुर रझ्झाक मुल्ला यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधात मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ातील बामुनघाटा येथे मंगळवारी काहीजणांनी हल्ला चढविला आणि त्यांच्या आठ गाडय़ा पेटवून दिल्या. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चढविल्याचा संशय आहे.
माकपचे नेते आणि माजी मंत्री कांती गांगुली यांनी सांगितले की, या हल्ल्यात तीन कार्यकर्ते गोळीबारात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला तृणमूलचे नेते अराबुल इस्लाम यांनी केल्याचा आरोप माकपने कोलकाता येथे पत्रकार परिषदेत केला. तृणमूल राज्यात हिंसाचार माजवित असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्याबाबत मौन बाळगून आहेत, असा माकपचा आरोप आहे. काँग्रेस पक्षानेही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे.
इस्लाम यांनी मात्र मुल्ला यांच्यावरील हल्ला माकपनेच चढविल्याचा आरोप केला आहे. आपल्याही गाडीवर मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांनी गोळीबार केला होता. आपल्याला ठार मारण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी मला वाचविले, असा दावाही इस्लाम यांनी केला आहे.

Story img Loader