पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधे झालेल्या हाणामारीमध्ये १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पश्चिम मिदनापूरमधील साबांग गावामध्ये गुरूवारी पंचायत निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात ही घटना घडली.
तृणमूल काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यासह पाच गंभीर जखमींना मिदनापूरच्या सादार रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दुसऱया एका घटनेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे(सीपीआय-एम) पश्चिम बंगालचे विरोधी पक्ष नेते सुर्यकांता मिश्रा यांना तृणमूलच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील खंडूरदाह ग्रामपंचायत गावामध्ये मतदान करून बाहेर पडत असताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मिश्रा याच्यासोबत हुज्जत घातली.
मतदान करून बाहेर आल्यावर मिश्रा यांनी पत्रकारांजवळ तृणमूलच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीतील हस्तक्षेपावर आक्षेप घेतल्यामुळे हा बाद झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर, बंकूरा आणि पुरूलीया जिल्ह्यांमध्ये जिल्हापरिषदा व ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या निवडणुक काळातील नेमणूकीला विरोध केला होता.