पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या पार्थ चटर्जी आणि अनुब्रत मंडल या दोन दिग्गज नेत्यांवर वेगवेगळ्या आरोपांखील कारवाई करण्यात आल्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून भाजपावर कठोर शब्दांत टीका करण्यात येत आहे. याच टीकेला उत्तर देताना असताना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी “लवकरच जनता त्यांना बुटाने मारणार आहे,” असे विधान केले आहे. याधी सुगतो रॉय यांनी जे पक्षाला (तृणमूल काँग्रेस) बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची कातडी सोलून बुट तयार करू, असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्याला उत्तर म्हणून दिलीप घोष यांनी वरील विधान केले आहे.
हेही वाचा >>> “राष्ट्रवादीतील पाच नेत्यांची चौकशी करायची आहे, त्यांची नावे लवकरच…” भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान
“सुगतो रॉय हे दिग्गज आणि मोठे राजकारणी आहेत. याआधी ते प्राध्यापक होते. मात्र विरोधकांवर टीका करण्यासाठी ते वापरत असलेली भाषा ऐकून आम्ही थक्क झालो आहोत. पक्षावर टीका करणाऱ्यांची कातडी सोलून त्याचे जोडे केले जातील, असे विधान रॉय यांनी केले आहे. मात्र एक दिवस येथील जनता त्यांना जोड्याने मारेल. हा दिवस लांब राहिलेला नाही,” असे विधान दिलीप घोष यांनी केले आहे.
हेही वाचा >>> २५ दिवसांत ८ रुग्णालयं, १३००० किमीचा प्रवास; ९ वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी लढा
सुगतो रॉय काय म्हणाले होते?
मागील काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांविरोधात तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाईवर रॉय यांनी प्रतिक्रिया दिली होती. “तृणमूल काँग्रेस पक्षाला अपमानित, बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाला बदनाम करण्याचा जे प्रयत्न करतील त्यांची कातडी सोलून बूट तयार केले जातील,” असे विधान सुगतो रॉय यांनी केले होते.
हेही वाचा >>> दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा
दरम्यान, दिलीप घोष यांनी लवकरच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना चपलेने मारहाण केली जाईल, असे विधान केल्यानंतर सुगतो रॉय यांनी अधिक प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तसेच औपचारिक शिक्षण न झालेल्या व्यक्तीच्या वक्तव्यावर जास्त प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही. खुद्द दिलीप घोष हेच आमच्या संपर्कात आहेत. त्यांना भाजपा नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, असा दावा रॉय यांनी केला.