तृणमूल कॉंग्रेसच्या १६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाचणाऱ्या तरुण मुलीवर पक्षाच्या नेत्यांनीच पैशाची उधळण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. तृणमूल नेत्यांच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ातील भानगर येथे पक्षाच्या १६ व्या स्थापना दिनानिमित्त मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तरुण महिला नृत्य करीत असताना तृणमूल कॉग्रेसचे नेते आणि २४ परगना जिल्हा परिषदेचे सदस्य मिर ताहिर अली यांनी व्यासपीठावर धाव घेतली आणि नाचणाऱ्या तरुणीवर पैसे उडवायला सुरुवात केली. या घटनेचे वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित झाल्यानंतर समाजाच्या विविध थरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
या घटनेनंतर तृणमूलचे खा. डेरेक ओ ब्रायन म्हणाले की, पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त राज्यात सर्वत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.अशाप्रकारची घटना ही दुर्मिळ असली तरी याप्रकरणी जबाबदार असलेल्या पक्षकार्यकर्त्यांवर कडक कारवाई केली जाईल,असे स्पष्ट केले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी अशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा करणे शरमेची गोष्ट असल्याचे सांगितले. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सुनंदा सन्याल यांनी या घटनेचा निषेध केला. बंगालमधील राजकारणात अशाप्रकारच्या घटना घडत असतील तर तरुण मुला मुलींच्या भविष्यासाठी हा प्रकार धोकादायक असल्याचे मत सन्याल यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा