गेल्या काही महिन्यांपासून देशात भाजपाविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, जदयू अशा अनेक विरोधी पक्षांनी यासंदर्भात इच्छुक असल्याची विधानं वेळोवेळी केली होती. त्यामुळे २०२४च्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विरोधी पक्षांच्या या प्रयत्नांना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
सागरदिघीतील पराभव ममता बॅनर्जींच्या जिव्हारी?
पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. सत्तेत असूनही ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे विरोधकांनी त्यावरून टीका करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली.
“मी कुणाला दोष देणार नाही”
सागरदिघीमधील पराभवासाठी आपण कुणाला दोष देणार नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. “कधीकधी लोकशाहीमध्ये विकास हा सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकतो. पण या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये एक प्रकारची अनैतिक युती झाली होती. याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. भाजपानं आपली मतं काँग्रेसकडे वळवल्याचं दिसून आलं”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठा झटका, पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; ममता बॅनर्जींची चिंता वाढली!
“निवडणुकीत प्रत्येकानं जाती-धर्माचं कार्ड वापरलं. भाजपानं अर्थात निवडणुकीला जातीय रंग दिलाच. पण काँग्रेस, माकपनंही मोठ्या प्रमाणावर या प्रकारचं राजकारण केलं. खरंतर भाजपाकडून मदत घेतल्यानंतर आता काँग्रेसनं स्वत:ला भाजपविरोधी म्हणणं बंद करायला हवं”, अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर टीकास्र सोडलं.
२०२४च्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा
दरम्यान, ममता बॅनर्जींनी पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. “२०२४मध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. आम्ही लोकांच्या पाठिंब्यावर निवडणुका लढवू. माझा विश्वास आहे की ज्यांना भाजपाला पराभूत करायचं आहे, ते नक्कीच तृणमूल काँग्रेसला मतदान करतील”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
एकीकडे भाजपाला पराभूत करण्यासाठी देशपातळीवर विरोधकांची आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे विरोधकांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.