TMC MP Arup Chakraborty on Kolkata Doctor Rape Case: कोलकातामधील महिला डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत आहेत. देशभरातील डॉक्टरांच्या संघटनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागात मोठ्या संख्येनं डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, संतप्त नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे खासदार अरूप चक्रवर्ती यांनी केलेलं धक्कादायक विधान चर्चेत आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
काय घडतंय कोलकात्यामध्ये?
कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठवड्यात ही बलात्काराची घटना घडली. रुग्णालयात रात्रपाळीसाठी काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पीडितेसोबत घडलेल्या पाशवी प्रसंगाचे धक्कादायक खुलासे पोलीस तपासात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील डॉक्टरांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून संपाचं हत्यार उपसलं आहे. याचा परिणाम देशभरात ठिकठिकाणी वैद्यकीय सेवेवर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच आता तृणमूल काँग्रेसच्या खासदाराच्या विधानामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काय म्हणाले TMC चे खासदार?
अरूप चक्रवर्ती हे पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष अर्थात TMC चे विद्यमान खासदार आहेत. ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा निषेध करताना तातडीने कारवाई व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढला आहे. अशाच एका मोर्चामध्ये सहभागी झालेले अरूप चक्रवर्ती यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात उलट डॉक्टरांवरच आगपाखड करून त्यांना इशारा दिला आहे.
“आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही कदाचित तुमच्या घरी जाल किंवा तुमच्या प्रियकरासोबत जाल. पण जर तुमच्या आंदोलनामुळे इथे एखादा रुग्ण दगावला आणि लोकांनी त्यांचा राग तुमच्यावर काढला तर आम्ही तुम्हाला वाचवणार नाही”, असा थेट इशाराच अरूप चक्रवर्ती यांनी दिला आहे. “डॉक्टर संपावर आहेत. पण संपाच्या नावावर जर ते बाहेर असतील आणि रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळाले नाहीत, तर त्यांचा राग डॉक्टरांवर निघणं हे साहजिक आहे. आम्ही त्यांना अशा वेळी वाचवू शकणार नाही”, असं थेट विधान अरूप चक्रवर्ती यांनी केलं आहे.
१४ ऑगस्टची हल्ल्याची घटना!
महिला डॉक्टरवर बलात्कार व हत्येनंतर या प्रकाराचा निषेध करण्यासाठी डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. पण १४ ऑगस्ट रोजी आर. जी. कार रुग्णालयात आंदोलन करणाऱ्या काही डॉक्टरांवर शेकडो अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढवला. त्यांनी काही आंदोलक व पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाणही केल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलनाच्या ठिकाणी या घुसखोरांनी तोडफोडही केली.
तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी आंदोलकांची बाजू घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण काहींनी मात्र ममता बॅनर्जी सरकारची पाठराखण केली आहे. “ममता बॅनर्जींकडे जे कुणी या प्रकरणात बोट दाखवत आहेत त्यांची बोटं आम्ही तोडून टाकू”, असं खळबळजनक विधान तृणमूल काँग्रेसचे नेते उदयन गुहा यांनी केलं होतं. तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, “काही लोकांना वाटतं की बांगलादेशप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये काही लोक गाणी गातील आणि ममता बॅनर्जी सरकार कोसळेल. पण हे शक्य नाही. तृणमूल काँग्रेस अशा कलाकारांवर बंदी आणेल, मग हे कलाकार काय करतील?” असा प्रश्न कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे.