आंतरराष्ट्रीय पातळीवर माध्यमांनी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या कंपनीवर भारतीय शेअर बाजाराला प्रभावित करून आपल्या शेअरची किंमत वाढवल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर देशातील विरोधी पक्षांनी अदाणी समुहासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही अदाणी समुहावर टीका करताना मोदींसह केंद्रीय आर्थिक संस्थांना सवाल केले आहेत. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.
महुआ मोईत्रा यांनी सेबी आणि ईडीला टॅग करत अदाणींच्या कंपनीतील १३.५ टक्के शेअर्सचे मालक ‘बेनामी’ असल्याचं म्हटलं. तसेच मोदींना टॅग करत ‘कुटुंबासारखे मित्र का?’ असा प्रश्न विचारला.
“२०१४ नंतर भाजपाच्या सर्वात चांगल्या मित्राबाबतचे सर्व आरोप…”
“२०१४ नंतर भाजपाच्या सर्वात चांगल्या मित्राबाबतचे सर्व आरोप आश्चर्यकारकपणे गायब होतात. मात्र, न्यायाला उशीर होऊ शकतो, पण न्याय नाकारता येत नाही,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी भाजपावर सडकून टीका केली.
“सेबी या घोटाळ्यात सहभागी आणि त्यांना घोटाळा शोधायचा नाही”
सेबीला टॅग करत महुआ मोईत्रा यांनी हा करदात्यांचा पैसा असल्याचं म्हटलं. त्या पुढे म्हणाल्या, “एकतर सेबी अदाणी घोटाळ्याचा शोध घेण्यास अक्षम आहे किंवा ते यात सहभागी आहेत आणि त्यांना हा घोटाळा शोधायचा नाही. काहीही असो सेबीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. चंद्रावर लँडिग केल्याने यावरील लक्ष हटणार नाही.”
हेही वाचा : VIDEO: चीनच्या च्यांग चुंग लिंगचा उल्लेख करत राहुल गांधींचा गंभीर आरोप; म्हणाले, “अदाणींच्या कंपनीत…”
“सेबीने आपलं कर्तव्य पार पाडावं”
आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये मोईत्रा यांनी अदाणी कंपनीच्या शेअर्सवर आणि भारतीय शेअर बाजारावर भाष्य करताना सेबीने आपलं कर्तव्य पार पाडावं असंही म्हटलं.