भाजपा नेत्यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मोईत्रा यांनी त्यांच्यावरील सगळे आरोप फेटाळले. तसेच आरोप कुणीही करु शकतो. मात्र ते सिद्ध करण्याची जबाबदारी आणि त्याचे पुरावे देण्याची जबाबदारी ही आरोप करणाऱ्याची किंवा तक्रार करणाऱ्याची असते, असंही म्हटलं. आता मोईत्रा यांनी एका पत्रकाराबरोबर व्हॉट्सअपवर झालेल्या चर्चेचा स्क्रिनशॉट शेअर करत खोचक टोला लगावला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर महुआ मोईत्रा यांनी एका चॅटचा व्हॉट्सअप स्क्रिनशॉट शेअर करत म्हटलं, “गोदी मीडियाला मुलाखत देण्यासाठी मी माझी किंमत सांगत आहे.”
व्हॉट्सअप स्क्रिनशॉटमध्ये नेमकं काय?
एका चॅनलच्या पत्रकाराने महुआ मोईत्रा यांना त्यांच्या मुलाखतीसाठी विचारणा केली. यावर महुआ मोईत्रा यांनी हसत छोचकपणे टीका उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “तुम्ही सध्या तुमच्या चॅनलवर माझ्या नावाने जो हिरे आणि पाचूचा हार दाखवत आहात. तो हार हीच माझ्या मुलाखतीची किंमत आहे. तुमच्या बॉसला जाऊन शब्दशः हे सांगा.”
महुआ मोईत्रा यांच्या या उत्तरानंतर समोरचा पत्रकार हो मॅडम म्हटलेलं या स्क्रिनशॉटमध्ये दिसत आहे.
“मी पैसे घेतल्याचा पुरावा आहे?”
दरम्यान, इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत महुआ मोईत्रा या आरोपांवर म्हणाल्या होत्या, “मी जर प्रश्न उपस्थित करण्याच्या बदल्यात पैसे घेतले होते तर हे कुठल्या तारखेला घडलं होतं जरा ती तारीखही मला सांगा. तसंच मी पैसे घेतले आहेत याचे पुरावेही सादर करा.”
हेही वाचा : गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश; हिंदुत्ववाद्यांशी पंगा घेणाऱ्या महुआ मोईत्रा कोण आहेत?
“जे प्रतिज्ञापत्र दिलं गेलं आहे त्यात दर्शन हिरानंदानी यांनीही मला रोख रक्कम दिल्याचा उल्लेख केलेला नाही. माझ्यावर अकारणच २ कोटी रुपये घेतल्याचा आरोप लावला जातो आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहद्रई यांना गुरुवारी संसदेच्या समितीने प्रश्न विचारले. समितीने एक दोनदा नाही १४ वेळा विचारलं की तुमच्याकडे तुम्ही जे आरोप करत आहात त्याचा काही पुरावा किंवा काही कागदपत्रं आहेत का? जर मी पैसे घेतले आहेत आणि दर्शन हिरानंदानी हे सरकारी साक्षीदार आहेत तर तातडीने संसदेच्या पटलावर त्यांनी पुरावे ठेवले पाहिजेत. माझ्यावर आरोप करत आहेत त्यांनी पुराव्यानिशी सांगावं मला कधी आणि कुठे पैसे देण्यात आले?”, असंही महुआ मोईत्रांनी म्हटलं.