देशात बनावट लसीकरणाला उत आला आहे. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री खासदार मिमी चक्रवर्ती देखील बनावट लसीकरणाच्या शिकार बनल्या आहेत. कोलकाता येथे कसबा परिसरातील लसीकरण शिबिरात गेलेल्या मिमी यांना कोविडची बनावट लस देण्यात आली. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान मिमी यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

जादवपुर लोकसभा मतदारसंघातील खासदार मिमी चक्रवर्ती यांना चार दिवसांपूर्वी लस देण्यात आली होती. मिमी यांना उलट्या, ताप आणि पोटात दुखत असल्याचे लक्षणे आहेत. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला पण त्यांनी सध्या घरीच राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून मिमीला फसवणाऱ्या देबांजन देब नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

टीएमसीचे खासदार मिमी म्हणाल्या, “एका व्यक्तीने मला आयएएस अधिकारी सांगत तो ट्रान्सजेंडर्स आणि दिव्यांग व्यक्तींसाठी एक विशेष लसीकरण मोहीम चालवित असल्याचे सांगितले. या बरोबर त्या व्यक्तीने मला लसीकरण शिबिरात येण्याची विनंती केली. लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी मला कोविशिल्डची लस देखील देण्यात आली. पण को-विन अ‍ॅपवर मला लस घेतल्याचा मेसेज आला नव्हता. त्यानंतर मी कोलकाता पोलिसात तक्रार केली. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली.”

२५० जणांना दिली बनावट लस

गेल्या सहा दिवसात कसबा केंद्रात किमान २५० जणांना लस टोचण्यात आली आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी देबांजन देब याने उत्तर व मध्य कोलकाता येथे बनावट लसीकरण शिबिरांचे आयोजन केले होते. यातील एक उत्तर कोलकाता येथील सिटी कॉलेजमध्ये आणि ३ जून रोजी सोनारपूर येथे एक शिबिराचे आयोजन केली होते. चौकशी दरम्यान देब याने पोलिसांना सांगितले की, त्याने लस बगडी मार्केट व स्वास्थ्य भवनाबाहेरून घेतली होती.