पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे. कोलकाता येथील ईडी कार्यालयात नुसरत जहाँ काही वेळापूर्वीच पोहचल्या आहेत. तिथे त्यांची चौकशी करण्यात येते आहेत. सॉल्ट लेक भागातील सीजीओ कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या कार्यालयात नुसरत जहाँ यांची चौकशी करण्यात येते आहे. शहरातल्या न्यू टाऊन या ठिकाणी घर देण्याचं आश्वासन देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे. याआधी ५ सप्टेंबर रोजी नुसरत जहाँ या ईडीसमोर हजर झाल्या होत्या.
ईडीने नुसरत जहाँ यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी बजावण्यात आलं होतं. त्यानुसार आज नुसरत जहाँ चौकशीसाठी उपस्थित झाल्या आहेत. नुसरत जहाँ या अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत.
काय आहे हे प्रकरण?
ईडीकडून सुरु असलेला हा तपास ज्येष्ठ नागरिकांच्या एका गटाने काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीशी संबंधित आहे. न्यू रिअल इस्टेट कंपनीने न्यू टाऊन परिसरात ज्येष्ठ नागरिकांना फ्लॅट देण्याचं आश्वासन देऊन फशवणूक केल्याचा आरोप केला होता. २०१४-२०१५ या वर्षात ४०० हून ज्येष्ठ नागरिकांनी पैसे जमा केले होते. प्रत्येक व्यक्तीकडून साडेपाच लाख रुपये घेण्यात आले होते. या पैशांच्या बदल्यात त्यांना १ हजार स्क्वेअर फूट फ्लॅट देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र तसं झालं नाही. कुणालाही फ्लॅट मिळालेला नाही. फ्लॅटही मिळालेला नाही आणि पैसेही मिळालेली नाही. त्यामुळे सेव्हन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या कंपनीवर २३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा नुसरत जहाँ कंपनीच्या संचालक होत्या. त्यामुळे त्यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे.
भाजपा नेते शंकुदेव यांनी या संदर्भात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडीने नुसरत जहाँ यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. दुसरीकडे मी या चौकशीत पूर्ण सहकार्य करेन असं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे. तसंच माझा या कंपनीशी काहीच संबंध नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.