काँग्रेस खासदार राहुल गांधी मागील अनेक महिन्यांपासून ‘भारत जोडो यात्रे’चं नेतृत्व करत आहेत. भारताचं दक्षिणेकडील टोक कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेनं आता हरियाणात प्रवेश केला आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असूनही राहुल गांधी आपल्या ध्येयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ते कोणत्याही गरम कपड्यांचा वापर करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे राहुल गांधींचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यांनी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा क्रांतिकारी असल्याचं म्हटलं आहे. शिवाय देशानं यापूर्वी कधीही अशी यात्रा पाहिली नाही, अशा शब्दांत सिन्हा यांनी भारत जोडो यात्रेचं कौतुक केलं आहे. ते ‘एएनआय’ या वृत्त संस्थेशी बोलत होते.
“राहुल गांधींची भारत जोडो यात्रा क्रांतिकारी आहे. या यात्रेमुळे राहुल गांधींचं व्यक्तिमत्व तरुणाईचं प्रतीक बनलं आहे. या देशाने यापूर्वी कधीही अशी पदयात्रा पाहिली नाही. या यात्रेमागील राहुल गांधींचा हेतू चांगला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो,” अशी प्रतिक्रिया टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली.