अवघ्या काही दिवसांपूर्वीच मुकुल रॉय यांची भाजपामधून स्वगृही तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले सुनिल मोंडल यांनी भाजपाच्या पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या लोकांवर पक्षाचा विश्वास नसल्याचा गंभीर दावा सुनिल मोंडल यांनी केला आहे. त्यामुळे आता मुकुल रॉय यांच्या पाठोपाठ सुनिल मोंडल यांची देखील घरवापसी होणार का? अशी चर्चा पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली आहे.
मुकुल रॉयनंतर मोंडलही स्वगृही परतणार?
गेल्या आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी स्वगृही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला. त्यापाठोपाठ भाजपामध्ये फसवणूक झाल्याची नाराजी व्यक्त करत अनेक कार्यकर्ते गावोगावी फिरत असल्याची दृश्य समोर आली. यानंतर आता सुनिल मोंडल यांनी देखील भाजपावर नाराजी व्यक्त केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजपाचा आमच्यावर विश्वास नाही!
सुनिल मोंडल यांनी बोलताना भाजपामध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याची देखील तक्रार केली. “तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना इथे अस्वस्थ वाटत आहे. त्यांचा भाजपामध्ये मनापासून स्वीकार केला गेलेला नाही. भाजपामधल्या काही लोकांना असं वाटतं की पक्षात नव्याने आलेल्या लोकांवर विश्वास ठेवणं योग्य नाही”, असं मोंडल म्हणाले आहेत. त्याचसोबत त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “सुवेंदू अधिकारी यांनी मला दिलेलं एकही वचन पाळलं नाही”, असं ते म्हणाले.
भाजपाच्या एका खासदारासह तीन आमदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर?
ममता बॅनर्जींचा भाजपावर निशाणा
दरम्यान, मुकुल रॉय यांची घरवापसी झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. “रॉय यांना भाजपमध्ये धमकी देण्यात आली आणि त्यांचा छळ करण्यात आला. त्याचा रॉय यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. भाजप कोणालाही शांततेने जगू देत नाही, सर्वांवर सातत्याने दबाव टाकण्यात येतो, हे मुकुल रॉय यांच्या स्वगृही परतण्यावरून स्पष्ट झाले आहे”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.