हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱयाच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी काळ्या पैशावरून लोकसभेत गदारोळ घालत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. लोकसभेतील गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, तृणमूलच्या खासदारांना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनता दल संयुक्त या पक्षांच्या खासदारांनीही साथ दिल्याने लोकसभेत भाजप सरकारविरोधात विरोधी पक्षाचे खासदार एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दुसऱया दिवसाचं कामकाजं सुरू होताच तृणमूलच्या खासदारांनी सत्तेत आल्यानंतर शंभर दिवसांच्या आत काळा पैसा मायदेशी आणण्याचे आश्वासन भाजप सरकारने अजूनही पूर्ण केले नसल्याचे सांगत  आक्रमक पवित्रा घेतला. काळा पैसा परत आणा अशा घोषणा लिहीलेल्या काळ्या छत्र्या घेऊन संसदेच्या प्रवेशद्वारावर भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यास तृणमूलच्या खासदारांनी सुरूवात केली. कामकाज सुरू झाल्यांनतर देखील तृणमूलच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसमोर काळ्या छत्र्या घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गोंधळी खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत काळ्या छत्र्या घेऊन येण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र यानंतर विरोधकांनी एकजूट दाखवत घोषणाबाजी सुरु ठेवल्याने दुपारी बारा पर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी बारानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावर शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न सभागृहासमोर मांडले.

Story img Loader