मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. पक्षाचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी हा दावा केला आहे. साकेत गोखले यांनी केलेल्या ट्वीटनंतर ही अटकेची कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
“तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. साकेत गोखले सोमवारी विमानाने नवी दिल्लीवरुन जयपूरला पोहोचले होते. गुजरात पोलीस यावेळी राजस्थानमध्ये विमानतळावर त्यांची वाट पाहत उभे होते. विमानतळावर पोहोचताच त्यांच्यावर कारवाई केली,” असा दावा डेरेक ओब्रियन यांनी ट्वीट करत केला आहे.
पुढे ते म्हणालेत की “मंगळवारी पहाटे २ वाजता त्यांनी आपल्या आईला फोन करुन पोलीस अहमदाबादला घेऊन जात असल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्यांना दोन मिनिटांचा तो फोन करण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर तो जप्त केला. त्यांचं इतर साहित्यही जप्त केलं आहे. साकेत यांनी केलेल्या एका ट्वीटप्रकरणी अहमदाबाद सायबर सेलने हा गुन्हा दाखल केला”.
गुजरात पूल दुर्घटनेच्या तपासावर लक्ष ठेवा; सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाला निर्देश
“पण यामुळे तृणमूल काँग्रेस शांत बसणार नाही. भाजपा राजकीय सूडाचं राजकारण एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
३० ऑक्टोबरला गुजरातमध्ये मोरबी पूल कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत तब्बल १३० लोकांनी आपला जीव गमावला. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा चाचणीत पुलावर नव्याने बांधकाम करताना धातूचा वापर केल्याने वजन वाढल्याचं समोर आलं होतं. फिर्यादीनुसार, दुरुस्ती करणारे दोन्ही कंत्राटदार दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं कामं करण्यास पात्र नव्हते. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे.