तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातील उलेमांच्या निवृत्तिवेतनात वाढ करीत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच हाज समितीला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ केल्याची आणि वक्फ बोर्डासाठी तीन कोटी रुपयांची वाढीव तरतूद करीत असल्याची घोषणाही जयललिता यांनी केली.
तामिळनाडूतील उलेमांच्या निवृत्तिवेतनात प्रतिमहा एक हजार रुपयांनी वाढ करीत असल्याची घोषणा एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली. तसेच निवृत्तिवेतनाच्या लाभधारकांची संख्या वाढवून २६०० झाल्याचे या पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
राज्यातील वक्फ बोर्ड मुसलमानांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवते, मात्र त्यांना आर्थिक तुटवडा भासत असल्याचे त्यांनी सरकारला कळविले होते, म्हणून वक्फ बोर्डाला तीन कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे तामिळनाडू सरकारने जाहीर केले, असे प्रसिद्धीपत्रकांत म्हटले आहे.
राज्यातील हाज समितीही आर्थिक संकटातून जात असल्याने, त्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात २०१२-१३ या चालू वित्तीय वर्षांसाठी २० लाख रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
मशिदी आणि दर्गे यांच्या देखभालीसाठी राज्यस्तरीय वक्फ बोर्ड व्यवस्थापन निधी स्वतंत्रपणे तयार करण्यात येत असल्याचे जयललिता यांनी जाहीर केले आहे. यासाठी तीन कोटी रुपयांच्या शासकीय मदतनिधीची घोषणा करण्यात आली.याबरोबरच, राज्यातील कल्लार जमातीसाठीही काही शैक्षणिक घोषणा करण्यात आल्या. तेन्ही जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिक शिक्षण सुरू करण्यात यावे, तसेच मदुराई येथील माध्यमिक शाळांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण सुरू करण्यात यावे, असे निर्देश दिले.

Story img Loader