नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन, केंद्रातील भाजपा सरकारला दिवसेंदिवस विरोध वाढत असतानाच, केंद्र सरकारने स्थानिक पक्षांसंदर्भात नरमाईचं धोरणं स्विकारण्याचं ठरवलं आहे. याच रणनितीचा एक भाग म्हणून, बिहारमधील भाजपाचा मित्रपक्ष जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपामधील अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जदयूने भाजपाचा हा प्रस्ताव स्विकारल्याचं समजतंय. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाचे दोन ज्येष्ठ खासदार राजीव रंजन आणि रामचंद्र प्रसाद सिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. “जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात आल्यास, भाजपाने स्थानिक पक्षासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. नितीश कुमार हे बिहारमध्ये NDA चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं अमित शाह यांनी आधीच सांगितलं आहे”, ज्येष्ठ भाजपा नेत्याने माहिती दिली. याचसोबत, आगामी निवडणुकांमध्ये बिहारमध्ये त्रिशंकु परिस्थिती भाजपा नेत्यांना नकोय. लालू प्रसाद यांच्या राजद पक्षाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भाजपाने नरमाईचं धोरणं स्विकारत जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जातंय.

मध्यंतरीच्या काळात CAB आणि NRC च्या मुद्द्यांवरुन जदयू आणि भाजपामध्ये कुरघोडी सुरु होत्या. मात्र यानंतर जदयूने CAB च्या समर्थनार्थ लोकसभेत मतदान केलं होतं. गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि अन्य स्थानिक पक्षांनीही भाजपाची साथ सोडली होती. त्यामुळे भविष्यकाळात आणखी एक राज्य हातातून न जाऊ देण्यासाठी भाजपाने आस्ते कदम भूमिका स्विकारायची ठरवली आहे.