गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने तसेच पाच राज्यांमधील निवडणुका पाहता सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.  मुंबई, दिल्ली, कोलकाता, वाराणसीत ६० ते ८० रुपये किलो कांदा विकला जात आहे. पाटणा आणि भोपाळमध्ये कांद्याच्या भावाने शंभरी गाठली आहे.
अतिवृष्टीने महाराष्ट्रात खरिपाच्या पिकांवर परिणाम झाला. त्याचा फटका कांद्याला बसला. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहेत. सामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत. आता किमान निर्यात दर वाढवण्यास फारसा वाव नसल्याने कांदा निर्यातीवर बंदीचा विचार सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. किमान निर्यातदर वाढवल्याने निर्यात घटली आहे. मात्र बाजारात कांदा कमी उपलब्ध असल्याने भाव भडकत आहे. कांद्याचे भाव काही दिवस ६० रुपये किलोपर्यंत स्थिरावले होते. मात्र हे भाव वाढतच चालल्याने निर्यातबंदीचा विचार सुरू आहे. गेली तीन महिने कांद्याच्या भावाने सामान्यांना रडवले आहे. कांद्याची महिन्याला देशात ९ ते १० लाख टन इतकी मागणी आहे. मात्र निम्याहून कमी पुरवठा होत असल्याने हे भाव वाढत आहेत. सरकारने सामान्यांना दिलासा देण्यासाठी निर्यात दर कमी केला. त्यामुळे आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत कांद्याची निर्यात २८ टक्के कमी झाली. कांद्याचे नवे पीक बाजारात आल्यावर या महिन्यात कांद्याचे झपाटय़ाने खाली येतील अशी सरकारला अपेक्षा
आहे.
दरम्यान राज्य सरकारांनी साठेबाजांवर कठोर कारवाई करावी अशी सूचना वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी केली आहे. डिसेंबरमध्ये नवे पीक आल्यावर हे भाव उतरतील अशी अपेक्षा शर्मा यांनी व्यक्त केली. कांद्याबरोबच भाज्यांचे भाव वाढत चालल्याने चलनवाढ ही सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचे शर्मा यांनी सांगितले.