काँग्रेस पक्षही केंब्रिज अॅनालिटिकाचा ग्राहक होता असा खळबळजनक खुलासा व्हिसल ब्लोअर क्रिस्तोफर वाइलीने केल्यानंतर आता या प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीची भारतातील भूमिका फक्त निवडणुकीपुरता मर्यादीत नव्हती तर अन्य सामाजिक प्रकल्पांमध्येही या कंपनीने सहभाग घेतला होता. केंब्रिज अॅनालिटिकाने भारतात निवडणूक रिसर्चपलीकडे केरळसह अन्य राज्यांमध्ये जिहादी कारवाया रोखण्यासाठी मोहिम राबवली होती.
केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये जिहादी विचारसरणीला पाठिंबा रोखण्यासाठी २००७ साली एससीएलला रिसर्च मोहिम हाती घेण्यास सांगण्यात आले होते. एससीएल केंब्रिज अॅनालिटिकाची उपकंपनी असून त्यांच्याकडे भारतातील ६०० जिल्ह्यातील सात लाख गावांचा डेटा आहे. तो सतत अपडेट होत असतो असे वाइलीने म्हटले आहे.
२०१२ सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी एका राष्ट्रीय पक्षासाठी एससीएलने जातीनिहाय जनगणनाही केली होती तसेच २००७ सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी बूथस्तरीय राजकीय सर्वेक्षणही केले होते अशी माहिती वाइलीने दिली आहे. वाइलीने काँग्रेसबरोबर जनता दल युनायटेडचेही नाव घेतले आहे. २०१० सालच्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनता दल युनायटेडला राजकीय रिसर्च करुन माहिती पुरवली होती असे वाइलीने म्हटले आहे.
जाणून घ्या काय आहे ‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरण?
संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी निगडीत आहे. २०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचं समोर आलं. केंब्रिज अॅनालिटिकाने ‘फेसबुक’वरील लक्षावधी नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय वापरला असा आरोप आहे. जवळपास पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचं उघड झालं आहे.