केरळमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या निपा व्हायरसचा सामना करण्यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याने जपान आणि ऑस्ट्रेलियामधून औषधे मागवण्याचा निर्णय घेतला आहे. एनआयव्ही व्हायरसला अटकाव करणाऱ्या या औषधाच्या ऑस्ट्रेलियात घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत कोझिकोडेमध्ये ही औषधे पोहोचतील अशी माहिती आहे.
केरळच्या कोझिकोडेमध्ये निपा व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हयुमन मोनोक्लोनल अँटीबॉडी एम १०२.४ हे औषध ऑस्ट्रेलियाहून मागवण्यात आले असून ते आज रात्रीपर्यंत कोझिकोडेमध्ये पोहोचेल. या औषधाचे ५०० डोस मागवण्यात आले आहेत. केरळमध्ये निपा व्हायरसमुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत निपा व्हायरसची दहशत संपूर्ण केरळमध्ये पाहायला मिळत आहे. इथल्या वैद्यकिय विभागातर्फे पर्यटकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यत्वे कोझिकोडे, मलाप्पुरम, वायनाड आणि कन्नूर या भागांमध्ये निपा व्हायरसिषयी जास्त सावधगिरी बाळगण्यात येत आहे.
निपाह विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी फळे खाताना ‘ही’ काळजी घ्या…
– निपाह विषाणूचा संसर्ग झालेले डुक्कर, प्राणी आणि दूषित फळे खाल्ल्यामुळे हा आजार पसरतो.
– अनेकदा रात्रीच्यावेळी फिरणारी वटवाघुळे झाडाला लागलेली फळे अर्धवट खाऊन सोडून देतात अशी फळे खाल्ल्यामुळे निपाहची लागण होऊ शकते.
– निपाह झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो.
– निपाह विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी झाडावरुन पडलेले कुठलेही फळ खाऊ नये.
– दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिका खंडात निपाह विषाणूचा प्रसार करणाऱ्या वटवाघुळाच्या अनेक प्रजाती आहेत.
– वटवाघुळे अनेकदा केळी, खजूर, आंबा आणि रसदार फळे अर्धवट खाऊन सोडून देतात.
– वटवाघुळे कधीही फणसाच्या झाडावर जात नाही पण आंबे आणि चिक्कू खातात कारण ही फळे नरम असतात. त्यामुळे खाली पडलेले आंबे, चिकू खाऊ नयेत.