बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखल्यानंतर आता सत्तारूढ जद (यू)ने राज्याबाहेर विस्ताराची योजना आखली असून त्यासाठी पक्षाला लवकरच नवे निवडणूक चिन्ह मिळणार आहे.

जद (यू)चे सध्याचे निवडणूक चिन्ह ‘बाण’ असून त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेण्याचे ठरविले आहे. ‘बाण’ऐवजी अन्य निवडणूक चिन्ह द्यावे यासाठी पसंतीची यादी पक्षाच्या वतीने आयोगाला सादर केली जाणार आहे.

आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून तेथे बिहारप्रमाणे आघाडी करून निवडणूक लढण्याची जद (यू)ची इच्छा आहे. त्यामुळे पक्षासाठी नवे चिन्ह हवे आहे, असे सूत्रांनी सांगितले. झाड, नांगरधारी शेतकरी अथवा झोपडी यापैकी एका चिन्हाला जद (यू)ची पसंती असेल, असेही सूत्रांनी सांगितले. वटवृक्ष हे संयुक्त समाजवादी पक्षाचे, झोपडी हे प्रजा समाजवादी पक्षाचे तर नांगरधारी शेतकरी हे लोकदलाचे चिन्ह आहे. हे पक्ष जुन्या जनता परिवारातील आहेत.

बिहार पॅकेजची अंमलबजावणी सुरू

नवी दिल्ली : बिहारसाठी घोषित करण्यात आलेल्या १.६५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत असलेली अनिश्चितता संपुष्टात आणण्यासाठी मंगळवारी केंद्र सरकारने पावले उचलली. जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्यात येत असून हे पॅकेज बिहारच्या जनतेसाठी असल्याचे केंद्राने म्हटले आहे. बिहार पॅकेजच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचे काम विविध स्तरांवर सुरू आहे आणि त्यावर नियमित देखरेख ठेवण्यात येत आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, धर्मेद्र प्रधान आणि पीयूष गोयल यांनी बिहार भाजपच्या नेत्यांना या प्रश्नावर आश्वस्त केले. बिहारमधील भाजप नेत्यांनी जवळपास डझनभर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व प्रकल्पांवर देखरेख ठेवून त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी १.६५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.

Story img Loader