दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील एका वार्डात भरती असलेल्या एका चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चिमुकलीच्या दोन्ही पायांना प्लास्टर केलेलं फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय. या चिमुकलीच्या बाजुलाच एक बाहुली देखील दिसतेय, आणि तिच्याही दोन्ही पायांना प्लास्टर केल्याचं दिसतंय. बाहुलीच्या पायातील प्लास्टर पाहून तुम्हाला जरा विचित्र वाटलं असेल. पण ही सगळी घटना समजल्यावर कदाचित तुम्हाला बाहुली आणि या चिमुकलीमधील अनोखं नातं लक्षात येईल.
जिक्रा मलिक नावाची एक 11 महिन्यांची चिमुकली खेळता खेळता अचानक बेडवरुन खाली पडली, त्यामुळे तिच्या पायांना गंभीर दुखापत झाली होती. लोकनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जिक्राच्या पायांना प्लास्टर करण्याचा निर्णय घेतला. पण चिमुकली प्रचंड घाबरली होती. डॉक्टरांना तिच्यावर उपचार करणं कठीण होऊन बसलं होतं, ती सतत रडत होती. अनेकदा प्रयत्न करुनही तिचं रडणं थांबत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी जिक्राच्या एका बाहुलीबाबत डॉक्टरांना सांगितलं. ‘जिक्राची आवडती बाहुली असून आणि ती दिवसभर त्या बाहुलीशीच खेळत असते. दूध पाजताना देखील प्रथम बाहुलीला खोटं खोटं दूध पाजायला लागतं त्यानंतरच जिक्रा दूध पिते’, असं नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितलं. हे ऐकल्यावर डॉक्टरांनी एक शक्कल लढवली.
डॉक्टरांनी जिक्राच्या नातेवाईकांना त्या बाहुलीला हॉस्पिटलमध्ये आणण्यास सांगितलं. बाहुलीला पाहताच जिक्राच्या चेहऱ्यावर अचानक हसू फुटलं. डॉक्टरांनी जिक्राच्या पायाला प्लास्टर करण्यास सुरूवात केल्यानंतर ती पुन्हा रडायला लागली. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या बाहुलीला आधी प्लास्टर केलं, त्यानंतर जिक्रानेही काहीही त्रास न देता आपल्या पायाला प्लास्टर करु दिलं.
“मीच माझ्या पतीला घरातून बाहुली आणायला सांगितलं होतं. ती बाहुली जिक्राच्या आजीने ती दोन महिन्यांची असताना दिली होती. तेव्हापासून जिक्रा बाहुलीसोबतच सतत खेळत असते. काहीही करायचं असल्यास पहिल्यांदा ते बाहुलीसाठी करावं लागतं, त्यानंतर जिक्रा तयार होते”, अशी प्रतिक्रिया जिक्राची आई फरीन यांनी दिली. तर, त्या बाहुलीला जिक्रा तिची मैत्रिण समजते अशी प्रतिक्रिया वडील मोहम्मद शहझाद यांनी दिली. दिल्लीच्या ‘ओखला मंडी’मध्ये त्यांचं भाजीपाल्याचं दुकान आहे. दरम्यान, बाहुली आणि चिमुकलीमधील हे अनोखं नातं पाहून उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले होते. या चिमुकलीला पूर्ण बरं होण्यास अजून एका आठवड्याचा वेळ लागण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. तर, सगळं हॉस्पिटल आता या चिमुकलीला ‘गुड़िया वाली बच्ची’ या नावाने ओळखतं.
बाहुली आणि चिमुकलीमधील हे अनोखं नातं पाहून उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले होते.