दिल्लीमध्ये एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही आम आदमी पक्षामध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांना लक्ष्य करण्यासाठी गेल्यावर्षी रेकॉर्ड करण्यात आलेले दूरध्वनी संभाषण सध्या प्रसारित करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या निमंत्रक पदावरून हटविण्यासाठी योगेंद्र यादव यांनी मोर्चेबांधणी केल्याचे चित्र असताना त्याविरोधात केजरीवाल यांच्याकडून हे संभाषण प्रसारित करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
केजरीवाल यांचे स्वीय सहायक बिभवकुमार यांनी २९ ऑगस्ट २०१४ रोजी दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राचे पत्रकार चंदर सुता डोगरा यांच्याशी दूरध्वनीवरून केलेले संभाषण रेकॉर्ड केले होते. डोगरा यांना न सांगता त्यांच्याशी झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. हेच संभाषण सध्या प्रसारित करण्यात आले आहे. डोगरा यांनी त्यावेळी काम करीत असलेल्या ‘द हिंदू’ दैनिकामध्ये एक लेख लिहिला होता. या लेखामध्ये हरियाणातील विधानसभा निवडणूक न लढविण्याच्या ‘आप’च्या निर्णयावर टीका करण्यात आली होती. हरियाणामध्ये योगेंद्र यादव यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचा मोठा विस्तार झाला असून, तेथील अनेक कार्यकर्त्यांना ‘आप’ने विधानसभा निवडणूक लढवावी, असे वाटत असल्याचे लिहिण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी ती निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचेही लेखात म्हटले होते.
याच लेखासंदर्भात बिभवकुमार यांनी डोगरा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. डोगरा यांनी लिहिलेल्या लेखात चुका असल्याचा दावा बिभवकुमार यांनी केला होता. त्यावेळी बिभवकुमार यांनी डोगरांकडे तुम्हाला माहिती कुठून मिळाली, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी योगेंद्र यादव यांनी तीन-चार पत्रकारांना फोन करून त्यांना नाश्त्यासाठी बोलावले होते. त्यांच्याकडूनच यासंदर्भातील माहिती मिळाल्याचे डोगरा यांनी सांगितले होते. ‘आप’च्याच एका गटाकडून हे रेकॉर्डिंग सध्या प्रसारित करण्यात आले आहे.

Story img Loader