पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तीन दहशतवादी हल्ले भारतावर झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवाक्षरही काढलं नसल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी एक्स पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

“शुभेच्छांना उत्तर देण्यात व्यस्त असलेल्या नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत. रियासी, कठुआ आणि डोडा येथे गेल्या ३ दिवसांत ३ वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत पण पंतप्रधान अजूनही उत्सवात मग्न आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “देश उत्तरे मागत आहे. भाजपा सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्यांना का पकडले जात नाही?” असा सवालही त्यांनी विचारला.

गेल्या तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले

जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांपूर्वी रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता. यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. 

हेही वाचा >> जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत दहशतवादी हल्ल्याची तिसरी घटना; डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार

मंगळवारी, जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील इंटरनॅनल बॉर्डरजवळ सैदा सुखल गावात दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात स्थानिक नागरिक जखमी झाले होते. या दहशतवाद्यांनी गावातील काही घरांमध्ये पाणी मागितलं. अज्ञात लोकांना पाहून गावकरी घाबरले होते. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे.

आज बुधवारी, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये ३ जवान जखमी झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तर अद्यापही डोडामध्ये चकमक सुरू असून काही ठिकाणी दहशतवादी लपल्याचा संशय लष्कराला असून त्या पार्श्वभूमीवर शोधमोहिम सुरु आहे.

गेल्या तीन दिवसांमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे आता जम्मू काश्मीरसह सीमांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरोच आंतरराष्ट्रीय सीमा, महामार्ग आणि पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चौक्यांवरही विशेष नजर ठेवण्यात आली आहे.