बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी रविवारी ५५ जागांवर मतदान होणार आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत जद(यू)सह बहुसंख्य जागाजिंकल्याने पक्षाच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गेल्या निवडणुकीत सदर ५५ जागांपैकी मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सीतामढी, शेओहर, गोपाळगंज आणि सिवान या जिल्ह्य़ांतील २६ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर त्या वेळी भाजपचा घटक असलेल्या जद(यू)ने २४ जागा जिंकल्या होत्या. राजदने दोन, तर अपक्षांनी तीन जागा पटकाविल्या होत्या.
तथापि, आता महाआघाडीतील राजदने २६ जागांवर, जद(यू)ने २१ जागांवर, तर काँग्रेसने आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने भाजपने ४२, लोकजनशक्ती पार्टीने पाच आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोकसमता पार्टीने प्रत्येकी चार जागांवर उमेदवारी उभे केले आहेत.
रविवारी होणाऱ्या मतदानासाठी १४ हजार १३९ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून एकूण ७७६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ५७ महिला उमेदवार आहेत.

लालूप्रसाद यांच्याविरुद्ध दोन एफआयआर 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याबद्दल राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.अमित शहा यांच्याबद्दल नरभक्षी आणि पागल अशी शेरेबाजी केल्याबद्दल एक एफआयआर शुक्रवारी नोंदविण्यात आला. दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून हा एफआयआर नोंदविण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी सांगितले.