अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी अत्यंत उत्साहात आणि आनंदात सुरु आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. अशात हनुमानगढीचे महंत राजूदास महाराज यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे.
काय म्हटलंय महंत राजूदास यांनी?
“मुंबईकरांनी अयोध्येत येऊन मंदिर निर्माण करण्यात मोठा वाटा उचलला. बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की बाबरीचा ढाचा माझ्या लोकांनी पाडला त्याचा मला अभिमान आहे. असा नेता पुन्हा होणार नाही.” असं राजूदास महाराज म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर भडकले महंत राजूदास?
मी हे गर्वाने सांगतो मी हिंदू आणि सनातनी आहे. वसुधैव कुटुंबकम ही आमची भावना आहे. आम्ही आजवर कुणाचाही अपमान केलेला नाही. मात्र हिंदू धर्म आणि सनातन धर्म यांच्या विरोधात बोललो की मला नावं ठेवली जातात. पण आज बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असणार हे नक्की. कारण आत्ता ज्या प्रकारचं राजकारण उद्धव ठाकरेंनी केलं त्या राजकारणाला तिलांजली देण्याचे विचार बाळासाहेबांचे होते. राम विद्रोहींबरोबर मिळालेली सत्ता त्यांनी घेतली नसती. दुर्भाग्य आहे की यांना सोनिया गांधी पाय धरायला मिळाले.” त्यांना निमंत्रणाचा प्रश्न आहे त्याबाबत मी सांगेन रामाला ज्याने नाकारलं, भाजपाचा इव्हेंट आहे म्हटलं त्या उद्धव ठाकरेंची अवस्था काय आहे? त्यांचा पक्ष फुटला, येणारा निधी थांबला, अनेकांना तुरुंगात जावं लागलं. ही सगळी बाब त्यांनी विचारात घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र असून असं वागत आहेत याच्या वेदना होत आहेत. गर्वसे कहो हम हिंदू है हा बाळासाहेबांचा नारा होता. त्याच बाळासाहेबांचे पुत्र रामद्रोहींसह उभे आहेत. अशी टीकाही राजूदास महाराजांनी केली.
त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते ज्या प्रकारे बोलत आहेत ते अतिशय निषेधार्ह आहे. घमंडिया आघाडीच्या लोकांनी म्हटलं की राम काल्पनिक होता. काळे कपडे घालून धरणं आंदोलन ज्यांनी केलं त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे गेले आहेत अशीही टीकाही राजूदास महाराज यांनी केली.
जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. महाराष्ट्राच्या लोकांना हे समजलं आहे. त्यामुळे निमंत्रण द्यायचं असेल तर तो निर्णय ट्रस्ट घेईल. पण माझं म्हणणं असं आहे की जे रामद्रोही आहेत त्यांना मुळीच बोलवू नये असाही सल्ला महंत राजूदास महाराज यांनी दिला आहे. एबीपी माझाला दिलेल्या छोट्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.